esakal | विघ्नहर्त्याची मूर्ती घेऊन जाताना पितापुत्रावर विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

विघ्नहर्त्याची मूर्ती घेऊन जाताना पितापुत्रावर विघ्न

sakal_logo
By
शंकर भामरे

पहूर (ता. जामनेर) : जामनेर तालुक्यातील शेरी - लोंढरी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident) एक जण ठार (Death) तर दोन जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने शेंगोळा गावावर शोककळा पसरली.

हेही वाचा: पारोळा : रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बैलांचा मृत्यू

शेंगोळा (ता. जामनेर) येथील राघो पुंडलिक बुंधे आणि त्यांचा मुलगा आकाश राघो बुंधे हे दोघे जण पहूर येथे गणपतीची मूर्ती घेण्यासाठी आले होते. मूर्ती घेऊन ते दोघे जण दुचाकीने (एमएच १९, डीपी २५ ४८) आपल्या घरी शेंगोळ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने (एमएच २८ बीजी ०९७९ ) त्यांना जबर धडक दिली. या अपघातात पहूरकडून शेंगोळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीवर मागे बसलेल्या आकाश राघो बुंधे (वय १६) याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक राघो पुंडलिक बुंधे आणि समोरून भरधाव वेगात येणारा दुचाकीस्वार दिलीप जगन्नाथ हुडेकर (रा. धामणगांव बढे, ता . मोताळा, जि. बुलढाणा) हे दोघेजण जखमी झाले.

गणेश चतुर्थीला गावावर शोककळा..

हा अपघात शेरी - लोंढरी मार्गावर अशोक पांढरे यांच्या शेताजवळ घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना मदत केली. शेंगोळा येथील सरपंच दिलीप भाऊ रदाळ, उपसरपंच संदीप साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले. या अपघातातील जखमी राघो पुंडलिक बुंधे यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर दिलीप जगन्नाथ हुडेकर यास किरकोळ दुखापत झाली असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोपान पुंडलिक बुंधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शेंगोळा येथील १६ वर्षीय दुर्देवी विद्यार्थी आकाश राघो बुंधे याचा गणेश चतुर्थीच्या दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने शेंगोळा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: वरखेडे शिवरात बिबट्याचा पाठशिवणीचा खेळ


श्रींच्या स्थापनेविनाच 'आकाश' गेला
दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रींची स्थापना करणारा आकाश यावर्षीही मोठ्या उत्साहाने आपल्या वडिलांबरोबर विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती घेण्यासाठी पहूरला आला होता. परंतु दुर्दैवाने त्याचा श्रींची स्थापना करण्याआधीच करुण अंत झाला. विघ्नहर्त्या गणरायाने हे विघ्न हरण करायला हवे होते, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

loading image
go to top