जळगाव महापालिकेत शंभर कोटी आणणारे गेले कुठे ? 

देविदास वाणी
Tuesday, 6 October 2020

राज्यात यापूर्वी मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असायचा. सुदैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्राचे नाहीत, तर ते अवघ्या महाराष्ट्राचे आहेत.

जळगाव : शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये गट-तट, नाराजी नाही. कोणी स्वतःसाठी कार्यक्रम घेत असेल, आंदोलन करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. स्वयंभूंनी जर पालकमंत्री, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुखांना न सांगता कार्यक्रम घेतला, आंदोलन केले तर तो कार्यक्रम शिवसेनेचा नसेल. अशा लोकांची शिवसेना दाखल घेईल, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महापालिकेत सत्ता द्या, शंभर कोटी देतो, सत्ता द्या, रस्ते चकचकीत करतो, असे बोलणारे कुठे गेले, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन यांना नाव न घेता लगावला. महानगरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यातील गट-तट, नाराजी दूर करण्यासाठी श्री. सावंत आल्याचे सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ५) त्यांनी बैठक घेतली. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिकेतील विरोधी गटनेते सुनील महाजन, नगरसेवक अमर जैन, नितीन बरडे, इबा पटेल, गणेश सोनवणे, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, कॉमेश सपकाळे, नितीन सपके, जाकिर पठाण, हेमंत महाजन आदी उपस्थित होते.

 

पुढारीपण करणाऱयाची दखल घेवू 

श्री. सावंत म्हणाले, की महानगरातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद नाहीत. जर कोणी स्वयंभू पुढारी म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यक्रम करीत असेल, आंदोलन करीत असेल तर त्याची शिवसेना दखल घेईल. जे कार्यक्रम, पालकमंत्री पाटील, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख यांच्या न कळत होत असेल तर ते शिवसेनेचे कार्यक्रम नसतील. 

 
समस्यांची जाण असलेला मुख्यमंत्री  
श्री. सावंत म्हणाले, की राज्यात यापूर्वी मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असायचा. सुदैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्राचे नाहीत, तर ते अवघ्या महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी केवळ मुंबईत नव्हे तर महारष्ट्रभर दौरे केले आहेत. त्यांना सर्व समस्यांशी जाण आहे. यामुळे ते सर्व प्रश्‍नांना चांगल्या तऱ्हेने तोंड देताहेत. 
ंमुख्यमंत्री ठाकरे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सलग सात-आठ दिवस बसून त्यांनी आरक्षणाविषयी मार्ग कसा निघेल यावर विचारविनिमय केला आहे. समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

महाराष्ट्र पोलिसांना भाजपने बदनाम केले 
पालकमंत्री पाटील म्हणाले, की अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरण भाजपचे पिल्लू आहे. लाखभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. झाली का चौकशी? ज्या शेतकऱ्याने मंत्रालयात येऊन आत्महत्या केली होती, त्याच्या घरी राज्यपालांनी भेट दिली नाही. कंगनाला मात्र भेट दिली. महाराष्ट्राच्या पोलिसांना भाजपने बदनाम केले. दीड महिन्यात काय झाले ‘खोदा पहाड निकला चूहा’. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Shiv Sena liaison chief Sanjay Sawant held a meeting of Jalgaon Municipal Corporation and gave guidance