esakal | दीड वर्षात केवळ उभारले खांब; मार्ग काढण्याचेही अनिश्‍चित
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji nagar railway bridge

रेल्वे पुलाच्या कामास प्रारंभ होऊन तब्बल दीड वर्षे होत आहे. मात्र अद्यापही या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या पुलाचे दोन्हीकडील खांब उभारून केवळ रेल्वेमार्गावरचे गर्डर टाकण्याचे काम झाले आहे. 

दीड वर्षात केवळ उभारले खांब; मार्ग काढण्याचेही अनिश्‍चित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरासह ग्रामीण भागाला जोडणाऱ्या शिवाजीनगर पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे या पुलाचा मार्गही अद्याप अनिश्‍चित असून, याबाबत महामार्ग विभाग व महापालिका प्रशासन अनभिज्ञ असून, त्यांच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
शिवाजीनगर रेल्वे पुलाच्या कामास प्रारंभ होऊन तब्बल दीड वर्षे होत आहे. मात्र अद्यापही या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या पुलाचे दोन्हीकडील खांब उभारून केवळ रेल्वेमार्गावरचे गर्डर टाकण्याचे काम झाले आहे. 

पुलाचा मार्गही अनिश्चित 
या पुलाचे काम संथ गतीने सुरू असतानाच त्याचा मार्गही अद्याप अनिश्‍चित असल्याचे चित्र आहे. कारण शिवाजीनगर भागाकडील टी. टी. साळुंखे चौकाकडे हा पूल उतरणार होता. मात्र मार्ग रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात अधिकारी मात्र त्याबाबत बोलण्यास तयार नाहीत. पुलाचा नकाशा बदलता येणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. परंतु दुसरीकडे त्या भागात बांधकामाची काहीही प्रक्रिया केल्याचे दिसत नाही. मग निश्‍चित पुलाचा मार्ग आहे तरी कसा? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

भरवस्तीतून महामार्ग धोकादायक 
पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सध्या शिवाजीनगरातील मध्यवर्ती भागातून हा पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. या रस्त्यावरून चोपडा, थेट मध्य प्रदेशात जाणारी वाहने जात असतात. मध्यवर्ती भागातील हा रस्ता लहान असतानादेखील या रस्त्यावरून महामार्गावरील अवजड वाहनेही जात आहेत. विशेष म्हणजे या मार्गावर वस्ती असून, रहदारी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत हा मार्ग धोकादायक बनला आहे. परंतु शिवाजीनगर पूल झाल्यावरही हाच पर्यायी मार्ग परराज्यातील वाहनांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पुलाच्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र भविष्यात सुविधा होणार असल्याने नागरिक ते सहन करीत आहेत. मात्र राज्य महामार्ग विभाग व महापालिका प्रशासन नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे दिसत आहे. या पुलाचा मार्ग कुठून जाणार, हे अद्याप नागरिकांपासून अंधारात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे या पुलाचे काम संथ गतीने का होत आहे, याबाबतही कोणीही माहिती देण्यास तयार नाही. त्यामुळे मार्ग निश्‍चिती करून पुलाचे काम वेगात करावे, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे. 

शिवाजीनगर पुलाच्या मार्गनिश्‍चिती करण्याबाबत महामार्ग विभागाला पत्र देऊन त्याबाबत लवकर माहिती देण्यात सांगण्यात येईल. पुलाचे काम निश्‍चित संथ गतीने सुरू आहे. मात्र शासनाकडून निधीचाही प्रश्‍न निर्माण होत असेल तर अर्थमंत्र्याची भेट घेण्यात येईल. काम वेगाने होण्याकामी प्रयत्न करण्यात येतील. 
- अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जळगाव 

loading image
go to top