भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीतही आता ‘महाआघाडी’ 

कैलास शिंदे
Saturday, 5 December 2020

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. त्यामुळे आघाडीची ताकद दिसून आली. आगामी काळात भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीतदेखील हे प्रयोग केले जातील. 

जळगाव : विधान परिषद निवडणुकीत विजयामुळे राज्यात महाविकास अघाडीची ताकद दिसून आली आहे. भाजपला थोपविण्यासाठी आगामी काळात स्थानिक निवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात येईल, असे मत शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. 
अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक जिल्हा बैठक झाली. या वेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी, पद्मसिंग पाटील, मुकुंद नन्नवरे यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, की जिल्हा परिषदेत आपली सदस्यसंख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात, त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशी ठिकाणे टार्गेट ठेवून काम करावे लागणार आहे. 

पोलिओ निर्मुलनाप्रमाणे सभासद नोंदणी शिबिर
येत्या वर्षात निवडणुका अधिक असल्याने त्या ठिकाणी पक्षसंघटना वाढविणे तसेच नोंदणी शिबिरे घेण्यात येतील. चार लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. पोलिओ निर्मूलनासाठी लावण्यात येणाऱ्या शिबिरांप्रमाणे सभासद नोंदणीची शिबिरे लावली पाहिजेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. त्यामुळे आघाडीची ताकद दिसून आली. आगामी काळात भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीतदेखील हे प्रयोग केले जातील. 

लोकसभेतही जिंकू
पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील या वेळी बोलताना म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डीपी दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडीला विधान परिषदेत यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shivsena meet ajintha rest house and gulabrao patil statement