सिम ब्लॉक झाल्याचे सांगितले आणि निवृत्त शिक्षिकेचे ‘दिवाळे’ निघाले ! 

रईस शेख
Wednesday, 11 November 2020

मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाउनलोड करावयाचे असल्याचे सांगून त्यावरून दहा रुपये टाकण्यास सांगितले. मात्र, दहा रुपये गेले नाहीत.

जळगाव : मोबाईलचे सिमकार्ड ब्लॉक झाले असून, ते सुरू करण्यासाठी अ‍ॅपवर जाऊन केवायएसी करा, तसेच आधारकार्ड स्कॅन करायचे सांगत अनिता पाटील या निवृत्त शिक्षिकेला ऑनलाइन पद्धतीने दीड लाखात लुटल्याची घटना घडली. जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

गांधीनगर-ओंकारनगर परिसरातील अनिता पाटील-खैरनार (वय ६२, रा. गांधीनगर, ओंकारनगर) सासूबाईसह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी दोन्ही अमेरिकेत राहतात. सोमवारी (ता. ९) दुपारी १२.४५ ला अनिता यांच्या मोबाईलवर जिओ कंपनीकडून सिमकार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याचा मेसेज आला. तसेच मोबाईलवरील लिंकवर केवायएसी करा, असेही आलेल्या संदेशात नमूद होते. मोबाईल बंद होईल या भीतीने अनिता पाटील यांनी ज्या क्रमांकावरून संदेश आला होता, त्यावर संपर्क केला. फोनवरून एक व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती, त्याने पाटील यांना मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाउनलोड करावयाचे असल्याचे सांगून त्यावरून दहा रुपये टाकण्यास सांगितले. मात्र, दहा रुपये गेले नाहीत.

यानंतर त्याने आधारकार्ड स्कॅन करण्यास सांगितले. अनिता पाटील यांनी आधारकार्ड स्कॅन केले. आधारकार्ड स्कॅन करताच, अनिता पाटील यांच्या बँकेच्या खात्यावरून दोन वेळा व्यवहार होऊन एक लाख ४९ हजार ९९४ रुपये ऑनलाइन विड्रॉल झाले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर अनिता पाटील यांनी मंगळवारी (ता. १०) सकाळी जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ९८८३७२३२८२ या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक प्रवीण भोसले तपास करीत आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Stolen money from retired teacher's online bank account