तहसीलदारांच्या टेबलावर फेकले पैसे, दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

तहसीलदारांच्या टेबलवर पैसे फेकण्याचा निंदनीय प्रकार केला. या घटनेचा निषेध व्यक्त करुन बारी यांच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.

यावल (जळगाव) : येथे शिवभोजन थाली केंद्र वितरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत काँग्रेसचे पदाधिकारी पुंडलिक बारी यांनी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या दालनात अनधिकृतपणे प्रवेश करीत त्यांना शिवीगाळ करून टेबलवर पैसे फेकल्याचा निंदनीय प्रकार बुधवारी (ता. ३०) घडला होता. या प्रकाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तालुक्‍यातील कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी आदी कर्मचाऱ्यांनी आज (ता. १) काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करीत काम बंद आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या फिर्यादीवरुन संशयित पुंडलिक बाजीराव बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात बुधवारी (ता. ३०) कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांची महत्त्वाची आढावा बैठक सुरू असताना काँग्रेसचे पदाधिकारी पुंडलिक बारी यांनी तहसीलदारांच्या दालनात अनधिकृतपणे प्रवेश करून तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना शिवभोजनाचा ठेका मला का दिला नाही, असा जाब विचारत अर्वाच्च भाषेत जोरजोराने बोलून शिवीगाळ केली. तसेच तहसीलदारांच्या टेबलवर पैसे फेकण्याचा निंदनीय प्रकार केला. या घटनेचा निषेध व्यक्त करुन बारी यांच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी आज (ता. १) प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, लिपिक, शिपाई, कोतवाल आदी कर्मचाऱ्यांनी यावल पोलिस ठाणे कार्यालयात एकत्र येऊन गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यवाही केली. तहसीलदार कुंवर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात बारी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात व्यत्यय आणणे, अधिकाऱ्यास धमकावणे, आपत्ती व्यवस्थापन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत. 

‘तत्काळ अटक करा’ 
या निंदनीय घटनेसंदर्भात तालुक्यातील महसूल कर्मचारी, जिल्हाधिकारी जळगाव, पोलिस अधीक्षक, जळगाव, तसेच प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुंडलिक बारी यांच्याविरोधात कडक कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी तसेच बारी यांस तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tahsildar threat on shivbhojan thali contract issue