कोरोनाग्रस्त डॉक्‍टर रुग्णालयात, कुटुंबीय क्वारंटाइन; "सील' घरातून दहा लाखांची रोकड लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

एक जूनला डॉक्‍टरांच्या पत्नी आणि मुलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. घरी जाऊन पाहिले असता, बेडरुमच्या खिडकीचे गज तोडलेले, आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी कपाट तपासले असता, यातून दागिणे आणि रोकड लंपास झाल्याचे समजले.

भुसावळ : शहरातील खडकारोड भागातील रजा नगरातील रहिवासी डॉक्‍टरास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तर पत्नी आणि मुलगा क्वारंटाइन सेंटरला होते. त्यामुळे घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी 10 लाख 60 हजाराच्या रोख रक्कमेसह सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. 

खडका रोड परिसरात दवाखाना असलेल्या 35 वर्षीय डॉक्‍टरास कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 24 मे रोजी जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची पत्नी देखील डॉक्‍टर असून, पत्नी आणि मुलास जवाहर नवोदय विद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दरम्यान घरात कुणीही नसल्याने पोलिसांनी घर सील केले होते. या संधीचा गैरफायदा घेत, चोरट्यांनी बेडरुमच्या खिडकीचे गज वाकवून कपाटातील 10 लाख 90 हजाराची रोकड आणि 60 हजार 900 रुपयांचे दागिणे लंपास केले. 

अशी उघडकीस आली घटना 
एक जूनला डॉक्‍टरांच्या पत्नी आणि मुलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. घरी जाऊन पाहिले असता, बेडरुमच्या खिडकीचे गज तोडलेले, आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी कपाट तपासले असता, यातून दागिणे आणि रोकड लंपास झाल्याचे समजले. याबाबत डॉक्‍टरांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे तपास करीत आहे. 

प्रशासनावर रोष 
कोरोना बाधित डॉक्‍टरांच्या पत्नी आणि मुलास जवाहर नवोदय विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आपण स्वत: डॉक्‍टर असल्याने आम्हाला घरातच होम क्वारंटाइन करण्याची मागणी डॉक्‍टरांच्या पत्नीने केली होती. यासंदर्भात त्यांनी प्रशासनास निवेदनही दिले होते. तरी देखील त्यांना नवोदय विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले. नेमकी हीच संधी साधत चोरीची घटना घडल्याने डॉक्‍टरांच्या पत्नीने प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Ten lakh cash robbary from Seal's house