
त्रस्त तरुणीने पोलिस ठाण्यात येत, ‘साहेब, किती वेळेस तक्रारी करू हो, आता आत्महत्येचीच पावती फाडा’, असे म्हणत ठाणे अंमलदाराकडे त्रागा केला.
जळगाव : कुटुंबाच्या गुजराणीला हातभार लागावा म्हणून घराबाहेर पडली, तर छेडखानीचा त्रास नशिबी आला. पोलिस मदत करतात म्हणून एक, दोन वेळेस वारंवार तक्रारी आणि एकदा चक्क विनयभंगाचा गुन्हा दाखल करूनही मनोविकृत तरुणाचा त्रास थांबला नाही. अखेर त्रस्त तरुणीने बुधवारी (ता. २५) पोलिस ठाण्यात येत, ‘साहेब, किती वेळेस तक्रारी करू हो, आता आत्महत्येचीच पावती फाडा’, असे म्हणत ठाणे अंमलदाराकडे त्रागा केला.
आवश्य वाचा- वडीलांचे ते शब्द भिडले हृदयाला; मग काय घर सोडले आणि रसवंतीवर करू लागला काम
शहरातील चौघुले प्लॉट भागात वास्तव्यास असलेल्या रिक्षाचालकाची २३ वर्षीय तरुण मुलगी... कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे फुले मार्केटमध्ये कामाला आहे. गेल्या वर्षभरापासून अमोल सुकलाल ठाकूर नावाचा तरुण तिच्या पाळतीवर आहे. भीतीदायक पाठलाग... मग, इशारे करून स्पर्श करण्याचा प्रयत्न, किळसवाणा प्रकार आदी छेडखानीला कंटाळून तरुणीने बुधवारी दुपारी शहर पोलिस ठाणे गाठले. घडला प्रकार ठाणेअंमलदाराने ऐकून घेतला. मात्र, कारवाई करण्याऐवजी घटना शनिपेठची असल्याचे सांगत या तरुणीला दुपारनंतर रवाना करण्यात आले.
तक्रारींचा रतिब...
वर्षभरापासून शहरातील हरिओमनगरातील अमोल ठाकूर हा त्या तरुणीचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे करतो. त्या तरुणीने सुरवातीला ११ नोव्हेंबर २०१९ ला शहर पोलिसांत, १२ नोव्हेंबर २०१९ ला शनिपेठ पोलिस, २० डिसेंबर २०१९ ला पुन्हा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याठिकाणी तीन वेळा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तीन वेळा तक्रारी करूनही त्याच्यावर ठोस उपाययोजना न झाल्याने ९ फेब्रुवारीला या भामट्याची हिंमत वाढून त्याने चक्क ओढताण करून या तरुणीचा विनभंग केला.
आवश्य वाचा- अमृत’मुळे साडेपाच लाख जळगावकर वेठीस
हाथरसची प्रतीक्षा की पारोळ्याची पुनरावृत्ती
जिल्ह्यात खून-दरोडे, लूटमारीच्या गुन्ह्याचा टक्का वाढला आहे. दुसरीकडे स्त्री अत्त्याचाराच्या घटनाही प्रंचड आहेत. नुकताच टोळी (ता. पारोळा) येथील तरुणीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याचे प्रकरण ताजेच असताना शहर पोलिस ठाण्यातील उपस्थितांनी या पीडित तरुणीला घटनास्थळ आमच्या हद्दीतले नसून शनिपेठच्या हद्दीचे असल्याचे सांगत रवाना केले. कुठे गेले वरिष्ठांचे आदेश व प्रशासनातील पारदर्शकता हीच का, असा प्रश्न अशा उत्तरांमुळे निर्माण झाला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे