विजयादशमीच्या मुहूर्तावर हाउसफुल; हजारांवर वाहनांचे बुकिंग 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

आयुष्यात आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. या मुहूर्तावर अनेकांनी गृहप्रवेश घेण्याची तयारी सुरू केली आहे. काहींनी स्वतःच्या बांधलेल्या घरात जाण्याचा, तर काहींची तयार घरे घेऊन गृहप्रवेशाचा मुहूर्त साधण्याची तयारी आहे. 

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला विजयादशमी अर्थात, दसरा या मुहूर्तावर अनेकांनी नवीन वाहनांचे आरक्षण केले. तसेच नवीन घरात प्रवेश करण्याचे नियोजित केले आहे. नवीन दुकाने, दालनांचा प्रारंभ करण्याचही नियोजन आहे. रविवारी (ता. २५) दसऱ्याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. अनेकांनी रोखीने वाहने घेण्यापेक्षा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन वाहने घेण्यावर कल आहे. 
कोरोना संसर्ग आता हळूहळू कमी झाला आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. व्यापार, बाजारपेठा, उद्योग खुले झाले आहेत. कोरोना संसर्गातून सावरून नागरिकांनी स्वतःचे व्यवसायही सुरू केले आहेत. काहींना नोकरी टिकविण्यात यश आले आहे. कोरोनोपासून काहीअंशी मुक्ती मिळाल्याने बाजारातील चलनवलन वाढले आहे. नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याने नवीन वाहने, नवीन घरे, नवीन दुकाने सुरू करण्यास सुरवात झाली आहे. विजयादशमी हा एक मुहूर्त आहे. ती संधी साधत अनेक नागरिकांनी नवीन दुचाकी वाहनांचे आरक्षण केले आहे. त्याची डिलिव्हरी रविवारी (ता. २५) घेणार आहे. 
आयुष्यात आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. या मुहूर्तावर अनेकांनी गृहप्रवेश घेण्याची तयारी सुरू केली आहे. काहींनी स्वतःच्या बांधलेल्या घरात जाण्याचा, तर काहींची तयार घरे घेऊन गृहप्रवेशाचा मुहूर्त साधण्याची तयारी आहे. 

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद आहे. ग्राहकांचा कल रोखीने वाहने घेण्यापेक्षा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन वाहने घेण्याकडे आहे. अनेकांनी दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांचेही आरक्षण केले आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे आम्ही विजयादशमीला ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. अनेक फायनान्स कंपन्यांनी डिस्काउंटची स्कीम सुरू केली आहे. 
- किरण बच्छाव (संचालक, सातपुडा ऑटोमोबाईल) ः 

आतापर्यंत दोनशेच्यावर गाड्यांचे बुकिंग झाले आहे. फायनान्सवर जास्त गाड्या घेतल्या जात आहेत. मात्र उत्पादकांकडूनच वाहने येत नसल्याने वाहनांचा शाॅर्टज आहे. तरीही आम्ही ग्राहकांना वेळेवर वाहने देण्याची व्यवस्था करीत आहोत. 
- योगेश चौधरी (संचालक पंकज ऑटोमोबाईल) 

आचा रेल्वेस्थानकामागे मकरा टॉवरचा प्रोजेक्ट आहे. त्यात शंभरावर घरांचे आरक्षण झाले आहे. चांगले लोकेशन, पाणी, विजेची व्यवस्था, पूर्व-पश्चिम घरे असल्याने ग्राहकांची घरांना चांगली पसंती आहे. ग्राहकांचा अधिकाधिक प्रतिसाद या प्रकल्पाला मिळाला आहे. 
- युसूफभाई मकरा (संचालक, मकरा टाॅवर्स) 

शंभरफुटी रोडलगत बारा फ्लॅटची स्कीम होती. नवरात्रोत्सवात त्या सर्वाचे आरक्षण होऊन विक्री झाली आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच अजून नवीन स्कीम शंभर फुटी रोडलगत सुरू करणार आहे. 

– सुनील मंत्री (संचालक, रुद्र स्केवेअर) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vijayadashami market full after corona