हृदयद्रावक..पाटाच्या पाण्यात बुडाले चिमुरडे; गल्‍लीत एकच हंबरडा

राजेश सोनवणे
Monday, 28 September 2020

धरणाजवळील सुभाष वाणी यांच्या शेताजवळ असलेल्‍या पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात ते पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्‍याने तिघांनाही बाहेर निघता आले नाही.

जळगाव : नशिराबाद जवळील वाघूर धरणाच्या पाटाच्या चारीतून वाहणाऱ्या पाण्यात तीन बालक पोहण्यासाठी गेले असता वाहून गेल्‍याची घटना घडली. पाहेण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाल्‍याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. 
गेल्‍या आठवडाभरापुर्वी जिल्‍ह्‍यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे सर्वच नदी, नाल्‍यांमधून अजून देखील पाणी वाहत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी अनेकजण नदीवर जात असतात. शिवाय, या वाहत्‍या पाण्यात पोहण्याचा आनंद देखील अनेकजण घेत आहेत. दरम्‍यान वाघूर धरण देखील पूर्णपणे भरले असल्यामुळे अनेक जण फिरण्यास व पोहायला जातात. 

नशिराबादमध्ये पसरली शोककळा
नशिराबाद येथील भवानीनगरमधील रहिवासी असलेले मोहित दिलीप नाथ (वय १२), आकाश विजय जाधव (वय १३) आणि ओम सुनील महाजन (वय ११) हे तिघेही आज दुपारी वाघूर धरणावर पोहायला गेले होते. धरणाजवळील सुभाष वाणी यांच्या शेताजवळ असलेल्‍या पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात ते पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्‍याने तिघांनाही बाहेर निघता आले नाही. सदर घटनेची माहिती जवळ असणाऱ्या लोकांनी पोलिसांना व ग्रामस्थांना दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले.

तिघांचे मृतदेह सापडे
पाण्यात बुडाल्‍यानंतर त्‍यांचा शोध घेण्यास सुरवात झाली. यात सर्वात प्रथम मोहितचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर वाहून जात असताना आकाश व ओम यांचे मृतदेह मिळाले. तिघेही जणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले होते. यावेळी एपीआय प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रवीण ढाके, पोना रवींद्र इंधाटे यांनी धाव घेतली होती. सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon waghur dam patchari three child death