‘वाघूर’वरून साडेसात लाख युनिट वीजनिर्मिती; पहिलाच प्रयोग 

देवीदास वाणी
Thursday, 27 August 2020

वाघूर धरणात पाणी असेपर्यंत वीजनिर्मिती होते. वर्षभरात तीन ते चार महिने प्रकल्प सुरू असतो. यंदा जूनपासून वीजनिर्मिती सुरू आहे. 
- वेणुगोपाल देशपांडे, प्रकल्प समन्वयक, वीजनिर्मिती प्रकल्प 

जळगाव : जिल्ह्यात आता धरणाच्या पाण्यावरून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. वाघूर धरणावरून वीजनिर्मितीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे. दोन वर्षांत चांगला पाऊस होत असल्याने हे शक्य झाले आहे. दोन वर्षांत आत्तापर्यंत साडेसात लाख युनिट वीजनिर्मिती झाली आहे. धरणाच्या पाण्यावरून वीजनिर्मितीचा हा प्रकल्प २०१५-१६ मध्ये मंजूर झाला. या प्रकल्पाचे काम अशोका बिल्डकॉनला ‘बीओटी’ तत्त्वावर देण्यात आले आहे. 

२०१६-१७, २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. यामुळे वाघूर धरणातील साठा पिण्यासाठी राखून ठेवण्यात आला. मात्र २०१९ मध्ये चांगला पाऊस झाल्याने धरण शंभर टक्क्यांपर्यंत भरले. यंदाच्या मोसमातही चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती सुरू आहे. 

रोज सात हजार युनिट 
हा प्रकल्प तीन ते चार महिने सुरू असतो. रोज पाच ते आठ हजार युनिट वीजनिर्मिती होते. त्यासाठी एका तासाला २५० क्यूसेक पाणी लागते. पाण्याची उपलब्धता व वीज वाहून नेण्यासाठी वीज किती उपलब्ध आहे, यावर वीजनिर्मिती होते. निर्मिती झालेली वीज चोरवड (ता. भुसावळ) उपकेंद्राला ग्रीडद्वारे पाठविली जाते. धरणात जोपर्यंत ८० टक्क्यांवर साठा आहे, तोपर्यंत वीजनिर्मिती सुरू राहील. नंतर मात्र धरणावरून पाणी न मिळाल्यास वीजनिर्मिती बंद होईल. 

अशी झाली वीजनिर्मिती 
२०१९ : चार लाख ४५ हजार ८०० युनिट 
२०२० : तीन लाख १२ हजार ७५० युनिट (आत्तापर्यंत) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon waghur dam vijnirmiti waghur dam in first Experiment