esakal | जगाच्या एक चतुर्थांश अंध व्यक्ती भारतात- डॉ.धर्मेंद्र पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Blind

जगाच्या एक चतुर्थांश अंध व्यक्ती भारतात- डॉ.धर्मेंद्र पाटील

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः भारतामध्ये जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टीहीन आहेत. बाहुलीचा पडदा खराब असणाऱ्या अंध व्यक्तीची (Blind People) संख्या ४.६० दशलक्ष असून बाहुलीच्या पडदा रोपणाने लाखो अंधव्यक्तिंना दृष्टी प्राप्त होत आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान (Eye donation) करून या जागतिक दृष्टीदान चळवळीत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ञ संघटनेचे माजी सचिव, नेत्ररोगतज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील (Ophthalmologist Dr. Dharmendra Patil) यांनी दिली

Dr. Dharmendra Patil

Dr. Dharmendra Patil


दरवर्षी केंद्र सरकारचे आरोग्य व कुटुंब मंत्रालय २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून पाळते. उद्या (ता. ८ सप्टेंबर) या पंधरवड्याचा समारोप होत आहे. त्यानिमित्त ते बोलत होते.


नेत्रदान कोण करू शकतो?
एक वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करु शकते. जिवंत असताना आपले डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. एखाद्या व्यक्तिने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईकांनी त्याच्या इच्‍छेचा आदर ठेऊन कार्यवाही करायला हवी. मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, चष्मा वापरत असणारे व्यक्तीही नेत्रदान करु शकतात.

हेही वाचा: वाढदिवसाला घडले विपरीत..बसाली धबधब्यात जळगावचे दोन तरुण बुडाले


नेत्रदान करतेवेळी घ्यावयाची काळजी
नेत्रदान करायचे इच्छापत्र लिहून दिल्यावर मृत्यूनंतर नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त ६ तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बॅंकेत जमा होतील, असे पहावे. त्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर नेत्र बँकेत दूरध्वनी करुन खालील बाबीची पूर्तता करायला हवी.
मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा. पंखा चालू असल्यास तो बंद करावा. शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

Eye donation

Eye donation


कोणत्या मृत व्यक्तीचे नेत्र दान होऊ शकत नाही
रॅबिज, सिफीलिस, सांसर्गिक काविळ, सेप्टीसेमिया आणि एड्‍स अशासारख्या रोगाने बाधित असणार्‍याना आपले डोळे दान करता येत नाही. यासोबतच कोविड संक्रमित किंवा संशयित व्यक्तीचे डोळे दान म्हणून घेऊ नये अशा मार्गदर्शक सूचना आहेत. जिवंतपणी कोणालाही कायद्यानुसार नेत्रदान करता येत नाही. ज्या व्यक्तीला डोळ्याचे रोपण करण्यात आले आहे त्या व्यक्तीलाही कोणाचे डोळे मिळाले आहेत, हेही सांगितले जात नाही. मृत व्यक्तीचे डोळे काढून घेणे ही क्रिया फक्त 30 मिनिटांची असून डोळे काढल्यानंतर कोणतीही खूण दिसत नाही. नेत्रदान हे दुसऱ्यासाठी जीवन दानासारखे आहे. जळगावात केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी असून ही नेत्रपेढी मानवतेच्या भावनेने प्रेरीत होऊन नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे डोळे जमा करुन त्या डोळ्यांना विकसित ‍करते आणि ज्या व्यक्तींना डोळ्यांची आवश्यकता आहे त्यांना त्या डोळ्यांचे वाटप करते. नेत्ररोपण करताना संपूर्ण डोळ्याचे रोपण होत नसून फक्त डोळ्यांच्या बाहुलीच्या पडद्याचे रोपण होते.

Eye

Eye


बाहुलीच्या पडदा अस्पष्ट होण्याची कारणे
संसर्ग, इजा, डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेणे, कुपोषण, अनुवंशिकता.

loading image
go to top