esakal | वाढदिवसाला घडले विपरीत..बसाली धबधब्यात जळगावचे दोन तरुण बुडाले
sakal

बोलून बातमी शोधा

Drowning death

वाढदिवसाला घडले विपरीत..बसाली धबधब्यात जळगावचे दोन तरुण बुडाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) (Madhya Pradesh) येथील बसाली धबधब्यावर (Basali Falls) जळगावातील मित्रमंडळी गेली हेाती. त्यापैकी धबधब्याच्या डोहात पोहताना जयेश रवींद्र माळी (वय २४) व त्याचा मित्र अक्षय (उज्ज्वल) राजेंद्र पाटील (२३, रा. विनायकनगर, खेडी) यांचा बुडून मृत्यू (Drowning death) झाला. रविवारी (ता. ५) रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही दोघे मिळून आले नव्हते. सोमवारी (ता. ६) दुपारी साडेबाराला दोघांचे मृतदेह हाती लागले. बऱ्हाणपूर रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सेापवण्यात आले.

हेही वाचा: चाळीसगावला पुन्हा सावधानतेचा इशारा..ओल्या दुष्काळाचे ही संकट


जयेश याचा रविवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने १५ ते १६ मित्रांसह पर्यटनाचा बेत आखला होता. रविवारी सकाळी आठला बऱ्हाणपूरच्या बसाली धबधब्यावर जाण्यासाठी मित्रमंडळी आपापल्या दुचाकीवर निघाले. धबधब्यावर पोचल्यानंतर पाण्यात खेळत असताना जयेशचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी उज्ज्वलनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, तोही बुडाला. घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाल्यानंतर रात्री अकरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, दोघेही सापडले नाहीत. रात्री उशिरापर्यंत दोघांच्या कुटुंबीयांना ही बाब कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जयेशसह उज्ज्वलचे नातेवाईक बऱ्हाणपूरला रवाना झाले. सोमवारी सकाळपासून शोधमोहीम राबविण्यात आली. दुपारी साडेबाराच्या सुमारास धबधब्याच्या कपारीत दोघांचे मृतदेह मिळून आले. त्यांची ओळख पटविण्यात आली. तरुण मुलांचे मृतदेह बघताच दोघांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. दुपारनंतर दोघांचे मृतदेह घेऊन नातेवाईक जळगावकडे रवाना झाले.

हेही वाचा: शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले..आणि मग सापडला खुनाचा संशयित


दोन्ही कुटुंबीय मध्यमवर्गीय
जयेशच्या मागे आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील रवींद्र माळी खासगी दुकानात अकाउंटंट आहेत. जयेश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. इलेक्ट्रिकलच्या दुसऱ्या वर्षाला होता, तर उज्ज्वल याच्यामागे आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. उज्ज्वल बजाज फायनान्समध्ये वसुली विभागात कामाला होता. त्याचे वडील राजेंद्र पाटील जळगावातील टीव्हीएस दुचाकीच्या शोरूममध्ये नोकरीला आहेत.

loading image
go to top