देवीच्या दर्शनाला गेलेल्या तरुणावर चॉपरने हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

गाडी लावत असताना तुकारामवाडीतील गोलू चौधरी याने संतोषच्या छाती, पोट, कंबर व हातावर चॉपरने सपासप वार करीत जखमी केले. अशाच अवस्थेत संतोष हा घरी पोचला. कुटुंबीयांसमवेत तो एमआयडीसी पोलिसांत दाखल झाला.

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर काही जणांनी चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जळगाव तालुक्यातील कुसूंबा आयटीआयजवळ राहणारे संतोष सुभाष कोळी (वय २९) यांच्या तक्रारीनुसार ते नवरात्रोत्सवात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तुळजाईनगर येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. याठिकाणी गाडी लावत असताना तुकारामवाडीतील गोलू चौधरी याने संतोषच्या छाती, पोट, कंबर व हातावर चॉपरने सपासप वार करीत जखमी केले. अशाच अवस्थेत संतोष हा घरी पोचला. कुटुंबीयांसमवेत तो एमआयडीसी पोलिसांत दाखल झाला. पोलिसांनी संतोषला देवकर महाविद्यालयातील आयुर्वेद रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तेथून त्यास डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. 

रस्त्यात अडवून हल्ला 
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी जात असताना उड्डाण पुलाजवळ कुणाल पाटील, राहुल बिऱ्हाडे, गोलू चौधरी, मयुर चौधरी, करण शिंदे, सागर अवतारे यांनी संतोषला अडवित त्याच्यासह सोबत असलेल्या पंकज गणपत सोळुंखेवरही चॉपरने वार करीत जखमी केले. तसेच त्या दोघांचे पाकीट व मोबाईल देखील त्यांनी हिसकविले. 

दोघांवर उपचार सुरु 
जखमी संतोष व पंकज या दोघांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असून संतोष कोळी याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young boy chopper attack gang