
सांडपाण्याचे ड्रेनेज काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. यासाठी महामार्गावर सुमारे २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे.
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गाला लागूनच ड्रेनेज पाइपासाठी खोदण्यात आलेल्या २० फूट खोल खड्ड्यात दुचाकीसह तरुण पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. ३) सायंकाळी सातच्या सुमारास आकाशवाणी चौकाजवळील गणपती हॉस्पिटल समोर घडली.
गणपती हॉस्पिटलजवळ सांडपाण्याचे ड्रेनेज काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. यासाठी महामार्गावर सुमारे २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी दीपक चौधरी (रा. फुकनगरी) हा आरओ सर्व्हिसिंगसाठी ग्राहकाकडे जात होता. दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून प्रभात चौकाकडे जात असताना महामार्गालगतच कुठल्याही सुरक्षा उपाययोजना न करता २० फूट खोल दरीसारखी चारी खोदण्यात आली आहे. सायंकाळच्या अंधारामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दीपक चौधरी दुचाकीसह कोसळल्याने जखमी झाला.
दोन दिवसांपूर्वी घेतली दुचाकी
दीपक चौधरी यांनी दोन दिवसांपूर्वी नवीन दुचाकी घेतली, महामार्गावर पथदीप नसल्याने आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे २० फूट खड्ड्याजवळ कुठलेही सुरक्षा उपाययोजना न केल्याने खड्डा दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाला. जखमी तरुणाला कंबरेला, मानेला व खांद्याला दुखापत झाली असून, थोडक्यात जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
संपादन ः राजेश सोनवणे