जीवनात अनेक धक्के सहन केले, आता कंटाळा आलाय असे लिहत तरुणीने केली आत्महत्या   

रईस शेख
Tuesday, 1 December 2020

आवाज देऊनही दार उघडत नाहीत म्हणून त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रियंका दिसून आल्या. परदेशी यांनी शोरूममध्ये तसेच जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला.

जळगाव : जीवनात अनेक धक्के खाल्ले, आता कंटाळा आलाय... यासह त्रास देणाऱ्यांच्या नावाचा उल्लेख सुसाइड नोटमध्ये करून तरुणीने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी (ता. १) उघडकीस आली. प्रियंका दास (वय २७) असे मत तरुणीचे नाव असून, तिचा प्रेमविवाह झाल्याचीही माहिती समोर येत आहे. पानभर सुसाइड नोट लिहून तिने मृत्यूला कवटाळले. 

आवश्य वाचा- अंगावर साधी जखम नाही तरी बिबट्याचा मृत्यू ? -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका शहरातील रिंग रोड परिसरात एका दुचाकीच्या शोरूममध्ये दोन वर्षांपासून नोकरीला होत्या. मूळ फीटर हाउस, भुसावळ येथील त्या रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त जिल्हा बँकेच्या मागील गल्लीत त्या रूम करून राहत होत्या. तेथे एकट्याच वास्तव्यास होत्या. सोमवारी सायंकाळ होऊनही प्रियंका मॅडम शोरूमवर का आल्या नाहीत, म्हणून शोरूममधील कर्मचारी विजय गोकुळ परदेशी, दास राहत असलेल्या घरी गेला. आवाज देऊनही दार उघडत नाहीत म्हणून त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रियंका दिसून आल्या. परदेशी यांनी शोरूममध्ये तसेच जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, कर्मचारी करुणासागर गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. प्रियंकाच्या आई-वडिलांना भुसावळ येथे कळविण्यात आले. 

पर्समध्ये पानभर सुसाइड नोट 
प्रियंकाने मृत्यूपूर्वी वहीचे पानभर चिठ्ठी लिहिली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी ही सुसाइड नोट हस्तगत केली आहे. त्यातील आशय असा ः जीवनात रोजच नवनवीन धक्के बसत आहेत. अनेक धक्के खाल्ले... आता या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय... याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान आत्महत्येला कारणीभूत काही लोकांची नावे तीन नमूद केली आहे. 

वाचा- चोरांची दुकानात मस्ती आणि बाहेर पोलिसांची गस्ती

याबाबत प्रियंकाचे भाऊ अर्जुनदास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत अद्यापर्यंत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. तसेच सुसाइड नोटही बघितली नसल्याचे सांगितले. या प्रकरणी शोरूमचे कर्मचारी विजय परदेशी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young woman committed suicide by writing a suicide note