esakal | आदर्श शिक्षक पुरस्‍कारात यंदा ही आहे विशेष बाब; जि.प. कडून पुरस्‍कार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon zilha parishad

जिल्‍हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी पंधरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार देवून गौरविण्यात येत असते. शिक्षण दिनाचा मुहूर्त साधून पुरस्‍कार वितरण झाले नसले तरी पुरस्‍कारर्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यंदाच्या पुरस्‍काराच्या यादीत एक विशेष बाब पाहण्यास मिळाली. कधी नव्हे तो यावर्षी प्रथमच पंधरा शिक्षकांमध्ये सहा महिला शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

आदर्श शिक्षक पुरस्‍कारात यंदा ही आहे विशेष बाब; जि.प. कडून पुरस्‍कार जाहीर

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांना "जिल्हा आदर्श पुरस्कार' आज जाहीर करण्यात आले. पुरस्कार वितरणासाठी शिक्षक दिनाचा मुहूर्त साधता आला नसला तरी नावे जाहीर करून मुहूर्त साधण्यात आला आहे. पुरस्‍कार वितरणाची तारीख अद्याप निश्‍चित करण्यात आली नसून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वेळ घेवून तारीख निश्‍चित केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात प्रत्येक तालुक्‍यातून एका शिक्षकांला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. त्‍यानुसार यंदा जिल्ह्यातून ३१ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. यानंतर जिल्हा निवड समितीकडे पाठविण्यात आले. यात मुलाखती घेवून पुरस्‍कारासाठी नावे निश्‍चित करण्यात आली असून विभागीय आयुक्‍तांकडून त्‍यास अंतिम मंजुरी घेण्यात येवून त्‍याची घोषणा आज जिल्‍हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी केली. 

प्रथमच सहा महिला शिक्षकांना पुरस्‍कार
जिल्‍ह्‍यातील आदर्श शिक्षकांना पुरस्‍कार देताना दरवर्षी पुरस्‍कार प्राप्त शिक्षकांमध्ये एक किंवा दोन महिला शिक्षकांचा समावेश असायचा. यंदाच्या पुरस्‍कारात प्रथमच पंधरा शिक्षकांध्ये सहा महिला शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे खऱ्या अर्थाने महिला शिक्षकांना समान न्याय यंदा शिक्षण विभागाकडून मिळाला आहे. मात्र यंदा उत्‍तेजनार्थ म्‍हणून कोणालाही पुरस्‍कार देण्यात आलेला नाही.

पुरस्कारप्राप्त शिक्षक 
मनिषा गोविंद चौधरी (शिरसाळे, ता. अमळनेर), सचिन हिलाल पाटील (पिंपळगाव बु.,ता. भडगाव), समाधान रामचंद्र जाधव (शिंदी, ता. भुसावळ), मालती संजय तायडे (मुलींची शाळा बोदवड), संजीव सिताराम थेटे (चौगाव, ता. चोपडा), गोरख मोतिराम वाघ (चौगाव., ता. चाळीसगाव), ज्‍योती लिलाधर राणे (कन्या शाळा साळवा, ता. धरणगाव), विनायक गोकुळ वाघ (खेडी बु., ता. एरंडोल), सुनील भागवत चौधरी (मुलांची उच्च प्रा. शाळा पाथरी, ता. जळगाव), नथ्‍थू धनराज माळी (चिंचखेडे बु. ता. जामनेर), वैशाली अशोक नांद्रे (वोळे तांडा, ता. पारोळा), किशोर अभिमन पाटील (वडगाव, ता.पाचोरा), सुशीला वसंत हडपे (कन्या शाळा मुक्‍ताईनगर), कल्‍पना दिलीप पाटील (निंबोळ, ता. रावेर), विनोद मनोहर सोनवणे (डांभूर्णी, ता. यावल).