
जिल्ह्यातील २६३ शाळांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. सोलर पॅनल बसविण्याचे काम महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा)ला दिले आहे.
जळगाव : जिल्ह्यातील शाळांवर बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनलसाठीचा दोन कोटींचा निधी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ‘मेढा’ या यंत्रणेकडे वळविल्याचा आरोप करत या प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता. १४) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला.
शुक्रवारी दुपारी झालेल्या ऑनलाइन सभेला अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला आणि बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी सभापती उज्ज्वला माळके, सदस्य नानाभाऊ महाजन, मधुकर काटे, रावसाहेब पाटील, अमित देशमुख, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील २६३ शाळांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. सोलर पॅनल बसविण्याचे काम महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा)ला दिले आहे. त्यासाठी दोन कोटी नऊ लाख ५२ हजारांचा निधी ‘मेढा’कडे वर्ग केला आहे. यावरून सभेत वाद झाला.
‘एनआरएचएम’वर नाराजी
‘मेढा’ला यापूर्वीही पाणीपुरवठा विभागाच्या योजनेचे काम दिले होते. मात्र, एजन्सीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले होते. तरीही पुन्हा याच एजन्सीला काम दिले, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणा (एनआरएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र दुरुस्तीच्या कामांसाठी सहा कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप नाना महाजन, मधुकर काटे, रावसाहेब पाटील यांनी केला.
सभेबाबत आयुक्तांकडे तक्रार
शुक्रवारी होणारी सभा ऑनलाइन असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सदस्य जिल्हा परिषदेत गेले नाहीत. मात्र, काही सदस्य जिल्हा परिषदेत गेले. आम्हाला सभा ऑनलाइन असल्याचे सांगण्यात आले. सभा ऑफलाइनच होती. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. तसेच ऑनलाइन सभेची लिंक वेळेवर दिली नाही. त्यात अडचणी येतात. ठराविक सदस्य जिल्हा परिषदेत येतात, त्यांना त्यांचे प्रश्न मांडता येतात. आमच्यावर हा अन्याय असल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी केला. पल्लवी सावकारे यांनीही ऑनलाइन सभेच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करत उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे तक्रार केली. सीईओंकडेही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे