नायलॉन मांजा कापला; पोलिसांकडून जप्तीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 January 2021

उच्च न्यायालयाने पतंग उडविण्यासाठी नॉयलॉनचा दोऱ्याला बंदी घातली आहे. तरी देखील अनेक ठिकाणी मांजाची निर्मिती करत विक्रीस दिसत आहे. 

जळगाव : शहरातील बागवान मोहल्ला परिसरातील मोची गल्ली जी पतंग गल्ली नावाने ओळखली जाते. या गल्‍लीत नॉयलॉनचा मांजा तयार करण्याचे काम चालत असते. परंतु, आकाशात पतंग उडण्यापुर्वीच नायलॉन मांजाचा दोरा कापला गेला. पतंग गल्‍लीत बेकायदेशीरपणे साठवणूक करण्यात येत असलेला साठ्यावर पोलीसांनी छापा टाकत जप्तीची कारवाई केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मकरसंक्रांत आली की साधारण महिनाभर आकाशात पतंग उडविले जातात. याकरीता अगदी सर्रासपणे नायलॉन मांजाचा दोरा वापरला जात असतो. परंतु, या दोऱ्यामुळे पक्षीच नव्हे तर मानवाला देखील हानी पोहचली आहे. मांजाला लावण्यात आलेल्‍या काचेमुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. यामुळेच उच्च न्यायालयाने पतंग उडविण्यासाठी नॉयलॉनचा दोऱ्याला बंदी घातली आहे. तरी देखील अनेक ठिकाणी मांजाची निर्मिती करत विक्रीस दिसत आहे. 

पतंग गल्‍लीतील मांजाचा सुगावा
उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना जळगाव शहरातील मोची गल्ली अर्थात पतंग गल्‍लीत मोठ्या प्रमाणावर नॉयलॉनचा मांजाची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीनुसार शहर व शनीपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत साधारणपणे ५० हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आला असून पोलीसांनी तो जप्त केला. याप्रकरणी संबंधित गोडावून मालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgoan makarsankrant nylon manja no use police action