हमिभावाच्या तुलनेत निम्मा दरही मिळेना! 

सुरेश महाजन
Sunday, 4 October 2020

यंदा बियाणे-खतांच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत सात ते दहा टक्के वाढ झाली आहे. त्यातही बहुतांश शेतकऱ्यांना महत्त्वाची आवश्यक खते ब्लॅकने (काळाबाजार) घ्यावी लागली.

जामनेर (जळगाव) : खासगी व्यापाऱ्यांकडून मक्याला केवळ ८०० ते ८५० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे, तर कपाशीला फक्त ३५०० ते ३८०० रूपये प्रती क्विंटलने खरेदी करण्यात येत आहे. उत्पादनाला केंद्र सरकारच्या हमी भावाच्या तुलनेत निम्मा दरही मिळेनासा झाला आहे. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. 
याबाबत शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, यंदा बियाणे-खतांच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत सात ते दहा टक्के वाढ झाली आहे. त्यातही बहुतांश शेतकऱ्यांना महत्त्वाची आवश्यक खते ब्लॅकने (काळाबाजार) घ्यावी लागली. शिवाय, शेमजुरांच्या रोजंदारीतही मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली. आता शेतमाल विकायला काढला तर विविध कारणे सांगून व्यापारी अत्यंत कमी भावांत माल खरेदी करीत आहेत. 

परतीच्या पावसाने फटका
यावर्षीही तालुक्यात पेरणीयोग्य शेती क्षेत्राच्या ६५ टक्क्यांवर शेतकऱ्यांनी कपाशीलाच पसंती दिली असून, त्यानंतर मक्याला महत्त्वाचे स्थान मिळाले. जिरायत- बागायत मिळून सुमारे २० टक्के शेतकरी वर्गाने मका लागवड केली आहे. परतीच्या पावसानेही काढणीला आलेल्या उत्पादनाला चांगलाच फटका बसला. कपाशी पिवळी पडून बोंडे ओलसर आहेत, तर मक्याला ओलसरपणा असून, व्यापारी खरेदी करताना या सर्व गोष्टी बारकारईने तपासत आहेत. त्याचा थेट परिणाम खरेदी दरात उघडपणे पाहावयास मिळतो. फक्त १४ ते १५ टक्के ओलसरपणा असल्यासच मक्याला पूर्ण म्हणजे तोही केवळ १००० ते १२०० पर्यंत क्वचितच भाव मिळताना दिसतो. इकडे मात्र सर्वांत जास्त लागवड झालेल्या कपाशीसाठी तो वेचून घरी आणल्यावर विक्रीआधी त्याला वाळत घालावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

रास्त भाव मिळण्याची अपेक्षा 
मागील वर्षीही सप्टेंबर-ऑक्टोबरमधील परतीच्या जोरदार पावसाने हाती आलेली अर्ध्याहून अधिक पिके खराब झाली होती, तर यंदाही मागील आठवड्यात झालेल्या पावसात बहुतांश पिकांची नासाडी पाहायला मिळाली. परिणामी, शेती उत्पादनाची नासाडी होऊन उत्पन्न तर घटलेच; पण आता भावही पाहिजे तसा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हैराण झाला आहे. येत्या काही दिवसांत तरी खासगी व्यापाऱ्यांकडून चांगल्या भावात खरेदी होण्याची आशा असली तरी लवकरात लवकर शासकीय खरेदी केंद्र सुरू तरी व्हावे, अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner corn and cotton market no hamibhav farmer