
नगरप्रदक्षिणेत विठ्ठल-रुखमाईची मूर्ती एकाच्या हातात असते. सवाष्ण महिला पूजा करतात. काकडा आरतीचा समारोप मारोतीच्या पारावर सकाळी सहाला होतो.
फत्तेपूर (ता. जामनेर) : शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन भजनी मंडळींनी सुरू केलेली परंपरा आजच्या पिढीनेही कायम ठेवली आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिना काकडा आरतीचा गजर असतो. हरिनामाने गाव दुमदुमून जाते.
वाचा- अरेच्च्चा शेतात पिक नव्हे तर वाळू, महसुल प्रशासनाची कारवाई
सर्व जण पहाटे साडेचारला श्रीराम मंदिरात जमतात. तेथून टाळ-मृदंगाच्या गजरात कांग नदीच्या पात्रात येतात. नदीला दीप अर्पण करून गंगावदनाचे अभंग गातात. तेथून पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालतात. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार यांचे अभंग म्हटले जातात. संत परंपरेचे वासुदेव गायले जातात. नगरप्रदक्षिणेत विठ्ठल-रुखमाईची मूर्ती एकाच्या हातात असते. सवाष्ण महिला पूजा करतात. काकडा आरतीचा समारोप मारोतीच्या पारावर सकाळी सहाला होतो.
निवृत्ती करंकाळ, पंढरी इधाटे (विणेकरी), कृष्णा हिंगे (मृदंग), कमलेश चौधरी, प्रकाश इधाटे (देवधर), टाळकरी अशोक चौधरी, अशोक इधाटे, हिंगे बुवा, माणिक चौधरी, प्रकाश बरकले, सुरेश सोनार, प्रकाश महाजन, अशोक हुंबड, समाधान हुंबड, प्रल्हाद शेळके, विनोद चौधरी, पंडित चौधरी, श्यामकांत कुलकर्णी, प्रभाकर धांडे, पंढरी शिंदे, ज्ञानेश्वर धोबी, प्रवीण चौधरी, प्रकाश चोपडे, शुभम बळोकर, यश चौधरी यांच्यासह आबालवृद्ध सहभागी होतात.
संपादन- भूषण श्रीखंडे