नाथाभाऊंना राजकारण कळतं, चुकीचा निर्णय घेणार नाहीत : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

खडसे पक्षावर नाराज असून त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी विचारले असता श्री. फडणवीस म्हणाले, खडसें आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत.

जळगाव : ‘नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावे, ही आमची सर्वांचीच इच्छा आहे.. त्यांना राजकारण अधिक कळतं, त्यामुळे ते पक्षांतराचा चुकीचा निर्णय कधीही घेणार नाहीत..’ असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 
जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. खडसे पक्षावर नाराज असून त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु आहे. त्यासंबंधी विचारले असता श्री. फडणवीस म्हणाले, खडसें आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. खडसेंशी भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले, आज मी त्यांना भेटलो नाही किंवा काही चर्चाही केलेली नाही. मात्र, योग्य वेळी आपण त्यांच्याशी सकारात्मक चर्चा नक्कीच करु. 
 
मंदिरं सुरु करण्यात काय अडचण? 
कोरोनाचे गांभीर्य सर्वांनाच आहे. परंतु, एकीकडे सर्व अनलॉक होत आहे. राज्य सरकारने मदिरालयं सुरु करुन त्यांना उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची मान्यताही दिलीय. पण, मंदिरं सुरु करण्यात सरकारला काय अडचण आहे? देशात अन्य ठिकाणी मंदिरं सुरु झाली असून त्याठिकाणी कोरोनासंबंधी सर्व प्रोटोकॉल पाळून दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. मंदिरं बंद असल्याने त्याठिकाणी साहित्य विकणारे, चहा विकणारे, हॉटेल्स, स्थानिक प्रवासी वाहतूकदार अशा सर्वांचीच उपासमार होत आहे. त्यांना सरकारने मदतही केलेली नाही. त्यामुळे मंदिरं तातडीने सुरु करावी, त्यासाठी आम्ही आंदोलन छेडल्याचे फडणवीस म्हणाले. 
 
मुख्यमंत्र्यांचे उत्तर दुर्दैवी 
अनलॉकमध्ये सर्व खुलं होत असताना राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यासंबंधी अनेक संघटना राज्यपालांनाही निवेदन देत असतात. राज्यपाल अशा प्रकारच्या निवेदनांना स्वत:चे पत्र जोडून ते मुख्यमंत्र्यांना देत असतात. मंदिरं खुली करण्यासंबंधी राज्यपालांनी याच निवेदनांसह मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन जनतेच्या भावना कळविल्या. त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीकाही फडणवीसांनी ठाकरेंवर केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner hospital opening program fadnavis statement eknath khadse