खासदार रक्षा खडसेंनी जामनेरचा दौरा करत गिरीश महाजनांची घेतली भेट

सुरेश महाजन
Saturday, 24 October 2020

ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिथी कक्षात दोघांनी विविध विषयांवर संवाद साधला. सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, तपशील कळू शकला नाही. त्यानंतर दोघांनीही काय चर्चा केली,

जामनेर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्नुषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा शनिवारचा (ता.२४) जामनेर दौरा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरला. एकनाथ खडसेंच्या पक्षांतरादरम्यान अनेकदा खासदार खडसे कोणती भूमिका घेतात, याविषयी तर्कवितर्क लढविले गेले होते. मात्र, त्यांनी आजच्या त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीद्वारे त्यांच्या विरोधकांना सूचक संदेश दिल्याचेच यातून ठळकपणे दिसून येते. 

जामनेरला आगमन झाल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची भेट घेतली. ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिथी कक्षात दोघांनी विविध विषयांवर संवाद साधला. सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, तपशील कळू शकला नाही. त्यानंतर दोघांनीही काय चर्चा केली, यावर भाष्य करण्याचे कटाक्षाने टाळले. या संवाद भेटीनंतर खासदार खडसे तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक (ता. जामनेर) येथे माजी अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील यांचे काका माजी मुख्याध्यापक एल. टी. पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने द्वारदर्शनासाठी तेथे गेल्या होत्या. तसेच भाजप कार्यकर्त्याच्या घरी झालेल्या नातेवाइकांच्या निधनामुळे द्वारदर्शनासाठी गेल्या. त्यात देवपिंप्री येथील जिल्हा चिटणीस तुकाराम निकम, राजू चौधरी (नाचणखेडा), तालुका उपाध्यक्ष भगवान इंगळे (नेरी) आदींचा समावेश आहे. या वेळी खासदार रक्षा खडसेंसोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सरचिटणीस रवींद्र झाल्टे, सुभाष वाघोडे, रवी पाचपोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner MP Raksha Khadse called on Girish Mahajan