जामनेरला हायप्रोफाइल जुगारअड्ड्यांवर पोलिसांचा छापा 

सुरेश महाजन
Monday, 23 November 2020

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे आधीच पोचल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच तक्रारींची दखल घेऊन नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.

जामनेर : शहरातील पहूर रस्त्यावरील बंद पडलेल्या ज्योतीबाबा पेट्रोलपंपाच्या परिसरात बिनबोभाटपणे सुरू असलेल्या ‘हायप्रोफाइल’ जुगारअड्ड्यावर नाशिक येथील पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात आठ मोटारसायकल, जुगाराच्या साहित्यांसह ४१ हजारांवर रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, तर सहा जणांना अटक केली. 

वाचा- जळगाव जिल्ह्यातील वार्षिक योजनेच्या निधी खर्चावरील निर्बंध मागे ?
 

गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह परिसरात जुगार, गावठी दारू, मटका व्यावसायाचे पेव फुटले आहे. कोरोनाचे वातावरण काहीअंशी कमी होताच या अवैध धंद्यांना पूर्वीप्रमाणे ऊत आला आहे. त्याचा सर्वसामान्यांसह शांतताप्रेमी जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या लेखी तक्रारी गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे आधीच पोचल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच तक्रारींची दखल घेऊन नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. यात जुगारअड्डा चालविणारे व खेळणारे असे मिळून सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात विशाल प्रताप वाघ, अरुण चांगो नरवाडे, राहुल राजू माळी, दीपक पंढरी भोई, दिलीप विजय माळी, सुमेध अरुण जाधव (सर्व रा. जामनेर) यांचा समावेश आहे. 

जामनेर पोलिस अनभिज्ञ कसे 
शहरासह परिसरात जागोजागी जुगारासह अवैध धंदे बिनबोभाटपणे सुरू असले तरी त्याची माहिती स्थानिक पोलिस प्रशासनाला कशी नाही. मात्र, हीच माहिती नाशिक पोलिस अधिकाऱ्यांकडे पोचते आणि कारवाई होते. त्यामुळे येथील पोलिस प्रशासनाविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

आवश्य वाचा- पोलिस ठाण्याशेजारीच पूल पार्टीचा धिंगाणा 

माहिती देण्यास टाळाटाळ 
अवैध व्यावसायिकांवर स्थानिक गुन्हे शाखा अथवा नाशिकच्या पथकाने केलेल्या कारवाईची इत्यंभुत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास टाळाटाळ केली जाते. एरवी कोणताही दुसरा विषय असला तर मोठा गाजावाजा करून बातमी प्रत्येकाजवळ बरोबर पोचविण्यात येते. मात्र, आज झालेल्या हायप्रोफाइल जुगारअड्ड्यावरील कारवाईची माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. याचीच चर्चा दिवसभर रंगली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner police raid jamner on high-profile gambling dens