
तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करून मालताबाई घरी आल्या होत्या. कोरोनाला हरविले.. पण अपघाताने नेले अशीच दुर्देवी परिस्थिती त्यांच्या बाबतीत घडली.
पहूर (ता. जामनेर) : कोरोनाशी यशस्वी लढा देवून घरी परतल्यानंतर घरात आनंद होता. यात नातूच्या रूपाने घरात नवीन पाहूणा देखील आला होता. यामुळे आनंद अधिक होता. परंतु, नियतीला हे मान्य नसावे म्हणून त्या नवजात शिशूचा पिता आणि कोरोनावर मात करणाऱ्या आजीला अपघाताने हिरावले आणि आनंदावर विरजन पडले.
पहूर येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेसह मुलाचा शिवना- मादणी मार्गावर झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. यात त्यांची चिमुकली नात ऐश्वर्या जखमी झाली असून तिला जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मालताबाई सुभाष थोरात यांची लहान सुन शितल सागर थोरात यांचे माहेर लाखनवाडा (जि. बुलढाणा) येथे आहे. बाळंतपणानंतर माहेरहून सूनेला पहूर गावी आणण्याकरीता आज सकाळी मालताबाई त्यांच्या स्वतःच्या पॅजो मालवाहू गाडीने मुलगा सागर व नात ऐश्वर्या यांच्यासह लाखनवाडा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या.
सात वर्षाची चिमुकली बचावली
प्रवास सुरु असतानाच शिवना- मादणी मार्गावर समोरून आलेल्या दुचाकी (एमएच २० एफ. ६४८१) आणि लाखनवाड्याकडे जाणाऱ्या त्यांच्या पॅजो (एमएच १९. ३३७२ ) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मालताबाई सुभाष थोरात (वय ५०) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सागर थोरात (वय २५) यांची जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली. सुदैवाने अपघातात ७ वर्षांची चिमुकली ऐश्वर्या बचावली असून दुचाकीवरील दोघे जण (रा. मादणी) जखमी झाले आहेत.
पतीचा आक्रोश
मालताबाई या बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवित होत्या. सागर हा सुद्धा आई- वडीलांना मदत करायचा. पतीच्या खांद्याला खांदा लावून मालताबाईंनी भाजीपाला विक्री व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली होती. अपघाताची वार्ता समजताच पती सुभाष थोरात यांच्यासह मुलाने एकच आक्रोश केला. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करून मालताबाई घरी आल्या होत्या. कोरोनाला हरविले.. पण अपघाताने नेले अशीच दुर्देवी परिस्थिती त्यांच्या बाबतीत घडली असून या हृदयद्रावक घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे