...अन् पुन्हा त्याच कारागृहात ‘एन्ट्री’ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

पहूर येथील लेलेनगरात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मगरेच्या राहत्या घरातून पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्यास अटक केली होती.

पहूर (ता. जामनेर) : जळगाव जिल्हा कारागृहातील सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखत आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत पलायन केलेल्या पहूर येथील रहिवासी बडतर्फ पोलिस सुशील मगरे याच्या रविवारी (ता. २९) भल्या पहाटे सिनेस्टाईल पहूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्याची एक दिवसाची पोलिस कोठडी सोमवारी संपल्याने त्यास दुपारी जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती हवेलीकर यांनी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असून, चार महिन्यांनंतर पुन्हा त्याची त्याच कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
पहूर येथील लेलेनगरात पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मगरेच्या राहत्या घरातून पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्यास अटक केली होती. त्याच्याजवळील पिशवीत असलेला गावठी कट्टा, धारदार सुरा, चार हजार रुपयांसह ५ ते ६ मोबाईलचे सीमकार्डही पोलिसांनी जप्त केले होते. त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यास जामनेर येथे न्यायमूर्ती हवेलीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या वेळी पहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे स्वतः उपस्थित होते. 

...अन् पुन्हा तेच कारागृह 
२५ जुलै २०२० ला सकाळी सातच्या सुमारास सुशील अशोक मगरे हा गौरव पाटील (रा. शिरुड नाका, तांबापूर, अमळनेर) व सागर पाटील (पैलाड, अमळनेर) या कैद्यांनी सुरक्षारक्षक पंडित गुंढाळे कर्तव्यावर असताना त्यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखत पलायन केले होते. तेव्हापासून पोलिसांना चकवत त्याने जिल्हा पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे केले होते. अखेर त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या अन् चार महिन्यांनंतर पुन्हा त्याच तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली आहे. 

आईला अश्रू अनावर 
सुशील मगरे यास वैद्यकीय तपासणीकामी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्याच्या भेटीसाठी पोलिस ठाण्यात आलेल्या त्याच्या आईला अश्रू अनावार झाले. पतीच्या माघारी लहानग्या सुशीलला विज्ञान शाखेचा पदवीधर करून पोलिस दलात नोकरी लागेपर्यंतचा सारा खडतर प्रवास त्याच्या आईच्या दृष्टिपटलावरून पुढे सरकत होता. पोटच्या मुलाला अशा अवस्थेत पाहून ‘त्या’ माउलीला अश्रू अनावर झाले. या वेळी सुशील मगरेची पत्नी आणि चिमुकला मुलगाही हजर होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner sunil magare again jail today police castdy