रामायण मालिका पाहून आठशे पानांचे श्रुतलेखन

शंकर भामेरे
Monday, 19 October 2020

लॉकडाउनच्या काळात सारेजण घरी होते. या रिकाम्‍या वेळात अनेकांनी आपले छंद घरी राहून जोपासले. पण शाळा बंद असल्‍याने कोणतेही शैक्षणिक काम नव्हते. अशात घरी बसून काय म्‍हणून माध्यमिक शिक्षकाने टीव्ही पाहून आपला संवाद लेखनाचा छंद जोपासला.

पहूर (जळगाव) : टाकळी बुद्रूक (ता. जामनेर ) येथील मूळ रहिवासी आणि महाराणा प्रताप विद्यालयातील माध्यमिक शिक्षक रविंद्र खरादे यांनी लॉकडाऊन काळात रामायण नाटिकेच्या एकूण ७८ भागांचे लेखन पूर्ण केले. 

संपूर्ण देश कोरोना संक्रमणात असतांना घरात राहणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने शासनाने दूरदर्शनवर २८ मार्च पासून रामायण या लोकप्रिय धार्मिक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू केले होते. त्याचे एकूण ७८ मालिका प्रसारित झाल्या असून १६ जुलैपर्यंत रामायण व उत्तर रामायनाचे प्रसारण पार पडले. तीस वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेली मालिका आज देखील प्रेक्षकांना तेवढाच आनंद देणारी होती. या अडचणीच्या काळात सर्वांनी त्या धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.

असे केले लेखन
भुसावळ येथील माध्यमिक शिक्षक रविंद्र खरादे यांनी तर संपूर्ण रामायण संवादासह लिहून संग्रहित केले आहे. पूर्ण संवाद हिंदी भाषेमध्ये आहेत. त्यांनी नाटकाप्रमाणे एकूण ८०० पानांमध्ये रामायण जशेच्या-तशे लेखन करून छंद जोपासला आहे. मालिकांमध्ये जाहिराती दरम्यान व वेळोवेळी युट्युबचा वापर करून लेखन हुबेहूब पूर्ण केले आहे.

खरादे यांचे आणखीही उपक्रम
रविंद्र खरादे हे टाकळी बुद्रुक येथील ग्रामीण शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच गावात जनजागृतीपर नाटीका, प्रौढ शिक्षण, पथनाट्य अशा विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत असत तेव्हापासून त्यांना आवड आहे. त्यांचा या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

"रामायण म्हणजे महान कथा, शिस्त, मान-सन्मान, संस्कार, शिकवणारी व आयुष्य घडवणारी मालिका आहे. बालपणी दूरदर्शनची सुविधा ग्रामीण भागात नसल्याने अपूर्ण राहिलेली इच्छा प्रत्यक्ष लिखाण करून पूर्ण करता आली, कोरोना काळात फावला वेळ मिळाल्याने रामायणाचे संपूर्ण संवाद लेखन करू शकलो याचा आनंद वाटतो.
- रविंद्र विष्‍णू खरादे, टाकळी बु. माध्यमिक शिक्षक, भुसावळ.  

संपादन ः राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner teacher watch ramayan and writing eight hundred page