त्‍यांच्या या निर्णयामुळे गावातील चाळीस मुलीसाठी भविष्‍य उज्‍वल

गणेश खिरडीकर
Friday, 11 September 2020

टपाल विभागाची सुकन्‍या योजना लाभदायक आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरीकांना यबाबत पुरेसे अवगत नाही. यामुळे आपल्‍या मुलींचे सुकन्या योजनेचे खाते अद्यापपर्यंत उघडलेले नाही.

कुऱ्हा-काकोडा (जळगाव) : मुला-मुलींचे वाढदिवस असले म्हणजे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जणू प्रथाच सुरू झाली आहे. मात्र, असे असले तरी आजच्या चंगळवादी दुनियेत सामाजिक भान जपणारी माणसेही आढळून येतात. नांदवेल (ता. मुक्ताईनगर) या आपल्या मूळ गावी मुलीच्या वाढदिवसाला खर्च न करता गावातील दहा वर्षांआतील सर्व मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याचा अनोखा उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी राबविला अन् खऱ्या अर्थाने आपल्या सुकन्येचा वाढदिवस साजरा केला. 
खामगाव (जि. बुलडाणा) येथील पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारीपदावर कार्यरत असलेले प्रदीप मुरलीधर पाटील यांचे मूळ गाव मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल आहे. ते नेहमीच समाजहितैषी कार्यक्रम करण्यासाठी अग्रेसर असतात. त्यांची मुलगी सईचा वाढदिवस, त्यात ते पोलिस प्रशासनात मोठ्या हुद्द्यावर असतानासुद्धा त्यांनी मुलीच्या वाढदिवसाला खर्च न करता गावातील सर्व दहा वर्षांआतील मुलींचे टपाल खात्यात सुकन्या योजनेचे खाते उघडून दिले. या वेळी त्यांना पासबुक वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य निलेश पाटील, शालिग्राम पाटील, मुरलीधर पाटील, भागवत पाटील, तुकाराम खिरोळकर, कविता प्रदीप पाटील, तसेच गावातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते. या वेळी सुमारे चाळीस मुलींचे खाते उघडून त्यांना पासबुक देण्यात आले. 

अन्‌ त्‍यांचे भविष्‍य उज्‍वल
टपाल विभागाची सुकन्‍या योजना लाभदायक आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरीकांना यबाबत पुरेसे अवगत नाही. यामुळे आपल्‍या मुलींचे सुकन्या योजनेचे खाते अद्यापपर्यंत उघडलेले नाही. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी आपल्‍या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्‍य साधून गावातील गरीब घरातील चाळीस मुलींचे खाते उघडून दिले. यामुळे निश्‍चितच त्‍या चाळीस मुलींचे भविष्‍य उज्‍वल बनले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar daughter birthday and father 40 girl open sukanya account