जातो माघारी पंढरीनाथा... माझे दर्शन झाले आता..! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

यंदा वारी होईल की नाही, याचीच चिंता महिनाभर सतावत होती. आई मुक्ताईने जवळ करून वारीला नेले. चंद्रभागा स्नान, नगर परिक्रमा, सकळ संतांचे दर्शन झाले. श्री विठ्ठलाचे दर्शन झाले. तो जीवनात परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवला. 
- महंत नितीनदास महाराज, मलकापूर. 

मुक्ताईनगर: वारकरी संतांचे आराध्य दैवत परमात्मा पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले मन विठ्ठल भेटीने तृप्त होत आनंदाने भरून आले... संत मुक्ताबाई आणि भगवान पांडुरंग देवाच्या भेटीचा नयनरम्य सोहळा आज द्वादशीदिनी पंढरपुरी विठ्ठल मंदिरात पार पडला. 

आषाढी वारी यंदा "कोरोना'मुळे स्थगित करण्यात आली होती. राज्य शासनाने मानाच्या नऊ दिड्यांना विशेष परवानगी देत शासनाचे देखरेखीखाली वीस वारकरींसमवेत पंढरपुरी नेण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एकमेव संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई चलपादुका दिंडीचा त्यात समावेश आहे. एकादशीला पोलिस संरक्षणात चंद्रभागास्नान, नगर परिक्रमा, साडीचोळी भेट आदी कार्यक्रम पार पडले. 

द्वादशीस सकाळी आठला मुक्ताई दिंडी श्री विठ्ठल भेटीसाठी दाखल झाली. श्री विठ्ठल मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी संत मुक्ताबाई चलपादुकांची विधिवत पूजा आरती केली. मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भय्यासाहेब रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. श्री गोमाजी महाराज पादुका नागझरी वतीने नितीन महाराज यांनी सन्मान स्वीकारला. 

परतीचा प्रवास 
शासनाने परतीचा प्रवास ठरवून दिल्याप्रमाणे आज दुपारी अकराला संत मुक्ताबाई पादुका दिंडीने पंढरपुरातून मुक्ताईनगरकडे परतवारी प्रस्थान ठेवले. रात्री उशिरा मुक्ताबाई पालखीची बस नवीन मंदिर येथे पोहोचेल. 

गोपाळकाला रविवारी 
आजपासून पालखी नवीन मुक्ताई मंदिरात मुक्कामी राहील. दररोज पूजा- भजन रात्री कीर्तन सेवा नित्यनेमाने करण्यात येतील. गुरुपौर्णिमेस 5 जुलैला गोपाळपूरचा गोपाळकाला उत्सव साजरा होईल.संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा परंपरेने 24 जुलैला मूळ समाधिस्थळी मुक्ताईनगर ते कोथळी साजरा करून आषाढी वारीची सांगता होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar pandharpur take muktai's paduka to Dindi Muktainagar