चित्ररूपी अष्टविनायक अन्‌ कोरोना जनजागृतीही 

दीपक चौधरी
Saturday, 29 August 2020

दर वर्षी गणेशोत्सवात लोक अष्टविनायक आणि इतर गणपती मंदिरांत दर्शनासाठी जातात. मात्र, या वर्षी जगावर कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळे सर्वांना घरात राहूनच गणेशोत्सव साजरा करावा लागला,

मुक्ताईनगर : गणेशोत्सवात देखावे आणि इतर माध्यमातून समाजप्रबोधन केले जाते. कालानुरूप यात अनेक बदल होत गेले, पण उद्देश कायम समाजप्रबोधनाचाच राहिला. यंदा कोरोना संसर्गाचे संकट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले असले, तरी कोरोनापासून बचावाच्या टिप्स, त्यासंबंधी जनजागृतीवर भर देत अष्टविनायकातील गणपतींचा महिमा संदेशातून साकारलाय जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी. 
दर वर्षी गणेशोत्सवात लोक अष्टविनायक आणि इतर गणपती मंदिरांत दर्शनासाठी जातात. मात्र, या वर्षी जगावर कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळे सर्वांना घरात राहूनच गणेशोत्सव साजरा करावा लागला, ही बाब लक्षात घेऊन रोहिणी खडसे यांनी फेसबुक, व्हॉट्सॲप ग्रुप व इतर माध्यमातून अष्टविनायक दर्शन आणि कोरोनाबाबत घ्यायची काळजी यासंबंधी चित्रमालिका साकारलीय. यात त्या रोज अष्टविनायकातील एक गणपती, त्याचा महिमा, पौराणिक महत्त्व आणि सोबत कोरोनाबाबत काळजी घेणारी टीप असे त्याचे स्वरूप आहे. या संकल्पनेत अष्टविनायकातील मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धेश्वर, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, महडचा वरदविनायक, पालीचा श्री बल्लाळेश्वर यांची माहिती आहे. 

बाप्पाचा संदेश 
त्याचबरोबर या मालिकेत ‘बाप्पा काय म्हणताय?’ या शीर्षकाखाली कोरोनापासून बचावाच्या उपाययोजनांची माहिती आहे. त्यात गर्दी टाळणे, दोन मीटरचे अंतर, तोंडावर मास्क, वेळोवेळी हात धुणे, स्वच्छता ठेवणे, सॅनिटायझर वापरणे या सर्व टिप्स दिल्या आहेत. 
 
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून राष्ट्रवादाचा जागर केला. काळानुरूप उत्सवात बदल होऊन प्रबोधनाचे स्वरूप आले. सध्या कोरोनामुळे भक्त गणेशदर्शनाला जाऊ शकत नाही, तोच धागा पकडून त्यांना अष्टविनायकाचे चित्ररूप दर्शन व्हावे, माहिती मिळावी आणि कोरोनापासून बचावाच्या टिप्सही मिळाव्यात म्हणून ही संकल्पना राबवतेय. सोशल मीडियाच्या या विधायक वापराला समाजातून चांगला प्रतिसाद मिळतोय. 
-ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर 
 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar rohini khadse ashtvinayak ganpati skatch and coronavirus awareness