नंदुरबार: मजुरांना घेण्यासाठी गेलेली क्रुझर नर्मदेत कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबार: मजुरांना घेण्यासाठी गेलेली क्रुझर नर्मदेत कोसळली

नंदुरबार: मजुरांना घेण्यासाठी गेलेली क्रुझर नर्मदेत कोसळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार : नर्मदा काठावरील गमन येथे मजुरांचे साहित्य घेण्यासाठी जाणाऱ्या क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल (Accident) झाल्याने ती थेट १४ फूट खोल नर्मदा नदीत (Narmada River) पडून बुडाली. मात्र धोका लक्षात घेऊन चालकाने आधीच वाहनाबाहेर उडी मारून आपला जीव वाचविल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आज दुपारी जेसीबीने नर्मदेत पडलेले वाहन बाहेर काढले.

हेही वाचा: सैनिकी शाळेतील ते २३ शिक्षक ६ वर्षांपासून विनावेतन !


अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम नर्मदा काठावरील आदिवासी पाड्यांमधील नागरिक रोजगारासाठी गुजरात राज्यात नर्मदा नदी पार करून ऊसतोड मजुरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात. मजुरीसाठी जाताना त्यांना नर्मदा नदी होडी (बार्ज) तून पार करावी लागते. त्यांच्यासोबत साहित्यही असते. त्यामुळे सिंदूरी, गमन येथील ऊसतोडीसाठी जाणारे मजूर बार्जने नर्मदा नदी पार करून अक्कलकुवा हद्दीत काठावर आले होते. तेथून त्या मजुरांचे सामान घेण्यासाठी गेलेली क्रुझर गाडी साहित्य भरण्यासाठी नदीच्या काठावर रिव्हर्स घेताना ब्रेक फेल झाल्याने थेट १४ फूट खोल नर्मदा नदीत कोसळली.

हेही वाचा: जळगावः गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार

गाडीतून बाहेर मारली उडी

गाडीचा ब्रेक लगत नसल्याने गाडी आता नदीत पडेल, हे लक्षात येताच चालक विनेश वसावे यांनी गाडीतून बाहेर उडी घेतली. त्यामुळे ते वाचले. त्यावेळी ते तेथे एकटे होते. स्थानिकांच्या मदतीने व जेसीबी आणि होडीच्या साह्याने गाडी नर्मदा नदीबाहेर काढली. महाराष्ट्रातील सर्वांत अतिदुर्गम भाग मानल्या जाणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने नागरिकांना आपल्या पद्धतीने मार्गक्रमण करावे लागते. नर्मदा काठावर अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. सुदैवाने गाडीत मजूर नसल्याने मोठा अपघात टळला.

loading image
go to top