जळगावः गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girna Dam

जळगावः गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणारभडगाव : गिरणा धरण (Girna Dam)सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन (Water cycle) सोडण्यात येणार आहे. पहिले आवर्तन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. येत्या २२ तारखेला कालवा सल्लागार समितीची (Advisory Committee) बैठक होणार आहे. त्यात आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होणार आहे. आवर्तनामुळे तिसऱ्या वर्षी गिरणा पट्टा हिरवाईने फुलणार आहे. जिल्ह्यातील साधारण: २५ हजार हेक्टरला या पाण्याचा लाभ मिळण्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) पाण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून (Girna Irrigation Department) करण्यात आले आहे.

हेही वाचा: जळगाव : रस्ते कामाच्या दर्जावरून मक्तेदार, अभियंता रडारवर


गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन केव्हा सुटणार याकडे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. रब्बी हंगाम सुरू होऊनही आवर्तन सुटत नसल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यापार्श्वभूमीवर २२ नोव्हेंबरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात रब्बीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय होणार आहे.

रब्बी हंगाम बहरणार
गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे. रब्बीसाठी एका आवर्तनाला साधारण २ हजार ६०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तीन आवर्तनांना साधारण साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागण्याची शक्यता आहे. गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता साधारण २५ हजार हेक्टरपर्यंतच पाणी पोहोचते. दरम्यान यंदा पावसाळा चांगला झाल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अगोदरच विहिरींच्या पाण्यावर रब्बीची पेरणी केली आहे.

पाटचाऱ्या दुरुस्त व्हाव्यात
गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येणार असले तरी अनेक भागात पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शासनाने पाटचाऱ्या दुरुस्तीसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, गिरणा पाटबंधारे विभागाकडून कालवा व पाटचाऱ्या दुरूस्तीचे काम जेसीबीच्या सहाय्याने होणार असल्याचे भडगाव गिरणा पाटबंधारेचे प्रभारी उपविभागीय अधिकारी पी. टी. पाटील यांनी सांगितले

पूर्व हंगामासाठी एक आवर्तन हवे
यंदा खरीप हंगाम चांगला बहरला होता. मात्र अतिवृष्टीने खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कापसावरही बोंडअडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पूर्व हंगाम कपाशी लागवडीसाठी गिरणा धरणातून मे महिन्यात किमान एक आवर्तन मिळायला हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: जळगाव : आला हिवाळा आरोग्य सांभाळा

गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्र

कालवा......लांबी (कि.मी.)..........वितरिका(कि.मी.)......क्षेत्र(हेक्टर)

जामदाडावा....५६.३६........४१८........१८६५८

जामदाउजवा...३२.१८.......२५०.........३६६३

निम्नगिरणा.....४५.५.........४९२.......३४८८८

पांझणडावा.....५३.२०........३१७.......१२१४१

गिरणा धरणाची सद्यःस्थिती
गिरणा धरणाची क्षमता...२१५०० दशलक्ष घनफूट
उपयुक्त जलसाठा.....१८५०० दशलक्ष घनफूट
मृत पाणीसाठा.....३००० दशलक्ष घनफूट
सद्यःस्थितीला पाणीसाठा....२१५०० दशलक्ष घनफूट
लाभक्षेत्र.....६९ हजार हेक्टर

गिरणा धरणावर अंवलबून असलेले क्षेत्र (हेक्टरमधे)
तालुका.............अवलंबून क्षेत्र
चाळीसगाव.............९६३
भडगाव..............१०५६३
एरंडोल..............१०३५४
धरणगाव.............२२१८७
अमळनेर..............१०२५८
पारोळा...............२८८४
मालेगाव..............१०००
धुळे.................१७००

हेही वाचा: जळगाव : विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात


गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी हवे असेल, त्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणीचा अर्ज करावा.
- देवंद्र अग्रवाल,
कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे, जळगाव.

loading image
go to top