पाचोऱ्यात दोनशे वर्षांच्या परंपरेला खंड

चंद्रकांत चौधरी
Sunday, 29 November 2020

पाचोरा येथील गांधी चौक परिसरातील बालाजी मंदिर ट्रस्टच्यावतीने दरवर्षी कार्तिक चतुर्दशीला बालाजी रथोत्सव साजरा होतो. रथ उत्सवाला गेल्या दोनशे वर्षांची आदर्श अखंडित परंपरा आहे.

पाचोरा (जळगाव) : येथील बालाजी रथ मिरवणुकीला यंदा कोरोनाची मोगरी लागल्याने गेल्या दोनशे वर्षांची रथ मिरवणुकीची परंपरा खंडित झाली. परिसरातील बालाजी भक्तांनी मंदिरासमोर येऊन रथाचे दर्शन घेऊन सुख समृद्धीची याचना केली.
पाचोरा येथील गांधी चौक परिसरातील बालाजी मंदिर ट्रस्टच्यावतीने दरवर्षी कार्तिक चतुर्दशीला बालाजी रथोत्सव साजरा होतो. रथ उत्सवाला गेल्या दोनशे वर्षांची आदर्श अखंडित परंपरा आहे. रथ उत्सवाच्या पहिल्या दिवशी रथ मार्गावर पालखी मिरवणूक काढली जाते व कार्तिक चतुर्दशीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सयाजी परिवारातील नवविवाहीत जोडप्याच्या हस्ते बालाजी मंदिरातील बालाजी महाराजांची मूर्ती रथात विराजमान करून रथाची विधिवत पूजन करून लोकसहभागाने रथ ओढला जातो. रात्री दहा वाजेच्या सुमारास रथ जागेवर येऊन या रथोत्सवाची सांगता होते. 

परंपरेला कोरोनाचा अडसर
वर्षानुवर्षाची ही परंपरा कोरोनामुळे खंडित झाली. रविवार (ता.29) रथोत्सव होता. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार रथ मिरवणूक यंदा प्रथमच रद्द करण्यात आली. बालाजी मंदिर ट्रस्टचे पितांबर पाटील, विश्वासराव पाटील, यशवंत पाटील यांचेसह बालाजी मंदिराचे विश्वस्त व सयाजी परिवारातील सदस्यांच्यावतीने तशा आशयाचे पत्र पोलीस व महसूल प्रशासनाला गेल्या आठवडाभरापूर्वीच देण्यात आले होते. त्यात रथ उत्सव रद्द करण्यात आला असून यानिमित्ताने कोणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले होते. 

पुजन अन्‌ रथाची पाचपावली
शनिवारी (ता 28 रोजी) सायंकाळी रथ बाहेर काढून रात्री उशिरापर्यंत साफसफाई करण्यात आली. यानंतर आज सकाळपासून सयाजी परिवारातील सदस्यांनी रथाची सजावट सुरू केली. प्रथम बालाजी मंदिरात विधीवत पूजन होऊन सजवलेल्या रथात बालाजी महाराजांची मूर्तीं स्थापना करून सयाजी परिवारातील भालचंद्र पाटील व संगीता पाटील यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. यारंतन पाच पावले रथ ओढून थांबवण्यात आला. बालाजी महाराजांचा जयघोष यावेळी उपस्थितांनी केला. भाविकांनी रथ स्थळी येऊन दर्शन घेतले व पूजन केले.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora balaji rathutsav two hundred volume to tradition