esakal | पाचोऱ्यात हिवरा नदीवर होणार तीन पूल; वाहतुकीचा प्रश्न लागणार मार्गी
sakal

बोलून बातमी शोधा

kishor patil

शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीवरील अरुंद पुलामुळे दरवर्षी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने कृष्णापुरी व कोंडवाडा गल्ली भागात पुल उभारणे तसेच शहराचा बाह्य रस्ता जोडण्यासाठी बाहेरपूरा भागात नवीन पूल यासाठीचे प्रस्ताव सादर केले होते. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने या तीनही पुलांना मंजुरी मिळाली असून सुमारे साडेअकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच पूर्ण केली जातील.
- किशोर पाटील, आमदार, पाचोरा- भडगाव

पाचोऱ्यात हिवरा नदीवर होणार तीन पूल; वाहतुकीचा प्रश्न लागणार मार्गी

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जळगाव) : शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या हिवरा नदीवर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत तीन ठिकाणी पूल बांधकामास मंजुरी दिली आहे. यासाठी ११ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्यात विस्तारित बांधकाम व अत्याधुनिक यंत्रसामुग्री यासाठी देखील ७ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. आमदार पाटील यांनी कोरोना संदर्भातील परिस्थितीचा लेखाजोखा मांडून राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या व पालिकेमार्फत करावयाच्या विविध विकास कामांसंदर्भातील माहिती दिली. शहरात प्रवेश करण्यासाठी जळगाव चौफुलीकडून बाहेरपूरा स्मशानभूमीमार्गे शहर बाह्य रस्ता जोडण्यासाठी हिवरा नदीवर नवीन मोठा पूल मंजूर झाला असून त्यासाठी ६ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर होऊन त्यापैकी २ कोटी रुपये पालिकेस प्राप्त झाले आहेत. तसेच हिवरा नदी वरील कृष्णापुरीतील अरूंद पुल सतत पाण्याखाली जात असल्याने शहराशी संपर्क तुटण्याच्या घटना अनेकदा घडल्याने या पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढवावी यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर पूलासही मंजुरी मिळाली असून कोंडवाडा गल्ली भागातील फरशी जवळ नवीन पुलही मंजूर झाला आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून शहरात प्रवेश करण्यासाठी नवीन रस्ता पुलासह तयार होणार असल्याने विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

वाढीव निधी
शहरात सुरू असलेले भुयारी गटारीचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी २ कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

खत कारखान्याचे विस्तारीकरण
पाचोरा येथे गेल्या चाळीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कृषी विभागाच्या खत कारखान्यात केवळ एकच प्रकारच्या खताचे उत्पादन होत असते. इतर ठिकाणी कारखाने बंद पडत असताना या खत कारखान्यात खत उत्पादन वाढ व नवीन खतांची निर्मिती यासाठी विस्तारित बांधकाम व अत्याधुनिक यंत्रसामुग्री यासाठी ७ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. खत कारखान्यातील विस्तारीत बांधकामाचे भूमिपूजन व शिवतीर्थ प्रांगणातील भव्य व मनोहारी उद्यानाचे लोकार्पण येत्या १७ ऑक्टोबरला सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे स्पष्ट केले.


गाड्यांचा लिलाव होणार
पालिकेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरात बांधण्यात आलेल्या २५० गाळ्यांच्या भव्य भाजीपाला व फळ संकुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या या महिन्याच्या अखेरपर्यंत या गाळ्यांचा बोली व पारदर्शक पद्धतीने लिलाव करून दुकानदारांना गाळ्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image