कोरोनाची महसूल विभागात धडक; प्रांताधिकार्‍यांसह नायब तहसीलदार तलाठी पॉझिटिव

चंद्रकांत चौधरी
Wednesday, 9 September 2020

कोरोनाने महसूल विभागाला धडक दिली असून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संभाजी पाटील, तलाठी मयूर आगरकर यांचाही रिपोर्ट पॉझिटिव आला आहे.

 

पाचोरा : येथील शहर व परिसरात कोरोना संसर्गाची लागण दिवसागणिक गतिमान होत असून लोकप्रतिनिधी, व्यापारी, पोलीस व आरोग्य अधिकारी यांच्यानंतर आता कोरोनाने महसूल विभागाला धडक दिली असून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह नायब तहसीलदार संभाजी पाटील व तलाठी मयूर आगरकर यांचा ही कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. जे कोणी गेल्या सात दिवसात संपर्कात आले असतील त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन राजेंद्र कचरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

पाचोरा येथे गेल्या मार्च महिन्यात पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर प्रशासनासह सारेच खडबडून जागे झाले होते. पालिका, महसूल, पोलीस व आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कंबर कसली होती. त्यामुळे बराच काळ रुग्णसंख्या अत्यंत धीम्या गतीने वाढली व सुमारे महिनाभर ती कायम राहिल्याने पाचोरा कोरोना मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त झाला. परंतु हा आनंद अल्पकाळ टिकला कारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येचा आलेख आजतागायत उंचावतांना दिसत आहे. पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलीस विभाग भयभीत झाला. बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली करून तपासणी करून घेतली काहींनी उपचारही घेतले .त्यानंतर कोरोनाने पालिकेकडे मोर्चा वळवला.

 

पालिकेचे बहुतांश कर्मचारी पॉझिटिव्ह झाले त्यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील कोरोना योद्धा म्हणून ओळखले जाणारे डॉ भूषण मगर, डॉ स्वप्नील पाटील ,डॉ किशोर पाटील हेही बाधित झाले. यासोबतच तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ हे ही बाधित झाल्याने प्रशासकीय यंत्रणा कमालीची भयभीत झाली.त्यानंतर आमदार किशोर पाटील त्यांच्या अर्धांगिनी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील हे ही बाधित झाले. माजी नगराध्यक्ष बापू सोनार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील , जिप सदस्य प्रकाश सोमवंशी, प्राचार्य डॉ बी एन पाटील हे ही पॉझीटिव्ह 
आले.

दरम्यानच्या काळात तहसीलदार कैलास चावडे हे ही कॉरंटाईन झाले होते. पोलीस अधिकारी, डॉक्टर, व्यापारी , पत्रकार,दुकानदार, मध्यमवर्गीय यांच्या नंतर आता कोरोनाने महसूल विभागाला धडक दिली असून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संभाजी पाटील, तलाठी मयूर आगरकर यांचाही रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान पाचोरा येथे बांबरुड शिवारातील शासकीय कोवीड सेंटर सह स्थानिक डॉक्टरांनी खाजगी स्वरूपाचे तीन कोवीड सेंटर उभारले असले तरी हे सर्व सेंटर हाउसफुल असल्याने बऱ्याच रुग्णांना जळगाव, औरंगाबाद, नाशिक, मुंबई येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. नागरिकांनी कोरोना संसर्गाची लागण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सोशल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करावा. शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून कोरोना पासून मुक्त राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Coronation Positive to Revenue Officer, Deputy Tehsildar, Talathi