esakal | शतपावली करण्यास जाणे पडले महागात; धूम गॅंगची आहे नजर
sakal

बोलून बातमी शोधा

gold chain robbery

मागून धूम स्‍टाईलने येवून काही समजण्याच्या आत गळ्यातील सोन्याची पोत लांबविण्याचे प्रकार ठिकठिकाणी घडत आहेत. रस्‍ता सामसूम असो किंवा तेथे वरदड असो. नजर ठेवून असलेली धूम गँग पोत लांबवून क्षणात पसार होत आहे.

शतपावली करण्यास जाणे पडले महागात; धूम गॅंगची आहे नजर

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जळगाव) : शहरालगतच्या वसाहतीत महिलेच्या गळ्यातील मंगल पोत लांबविण्याच्या घटना घडत असून धूम गँग सक्रिय झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. भडगाव रोड भागात शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची मंगल पोत मोटर सायकलवर आलेल्या दोघांनी ओरबडून धूम ठोकली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
भडगाव रोड भागातील कृष्णा दर्शन सोसायटीत राहणाऱ्या सुवर्णा सोनवणे या शेजारील महिलांसोबत सायंकाळी वसाहत परिसरातच शतपावली करण्यासाठी गेल्‍या होत्‍या. रस्‍त्‍याने चालत असताना राजीव गांधी कॉलनी समोरून मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील मंगल पोत ओरबडून धूम ठोकली. मंगल ओढल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. ती ऐकून काहीजण घराबाहेर आले. परंतु तोपर्यंत चोरटे मोटरसायकलने पसार झाले होते. 

महिलांमध्ये भिती
सुवर्णा सोनवणे यांचे पती भारतीय लष्कर सेवेत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देउन परिसराची पाहणी केली. उपनिरीक्षक विकास पाटील पुढील तपास करीत आहेत. या प्रकारामुळे सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड भिती पसरली असून पोलिसांनी शहरालगतच्या वसाहतीत दिवसासह रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व अपेक्षा व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top