
शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आपण काय करतो त्याचे आत्मपरीक्षण करावे. आम्हीच नंबर वन आहोत असा टेंभा मिरवू नये. आता शिवसेनाच जिल्ह्यात नंबर वन असून पाच आमदारांची संख्या दहावर पोहोचायला आता वेळ लागणार नाही.
पाचोरा : "आम्हीच नंबर वन असा टेंभा मिरवणाऱ्यांनी आता तरी शुद्ध धरावी. शिवसेनाच जिल्ह्यात नंबर वन आहे. अकरा पैकी पाच आमदार शिवसेनेचे आहेत. आता ते दहा व्हायला वेळ लागणार नाही. खासदारकीची गाडी सुद्धा आमच्या भरोशावर आहे; आम्ही विचार केला तर ती केव्हाही पलटी करू.' असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पाचोरा येथील कार्यक्रमप्रसंगी भाजपला लगावला.
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी चिंतामणी सोसायटीतील "सिंहगड' या आपल्या निवासस्थानाजवळ मतदारसंघातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना वेळीच न्याय देता यावा; या उद्देशाने अत्यंत भव्य, देखणे व सुसज्ज असे 'शिवालय' संपर्क कार्यालय थाटले असून त्याचे उद्घाटन आज (ता. 19) शिवसेना स्थापना दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 'शिवतीर्थ' या शिवसेना कार्यालयात स्थापना दिनानिमित्ताने पूजन करण्यात आले. सुरुवातीला चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील पाटील ,जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार किशोर पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंह पाटील, दीपकसिंह राजपूत, संजय पाटील (भडगाव), उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, दिनकर देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आता शिवसेनाच नंबर वन
शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आपण काय करतो त्याचे आत्मपरीक्षण करावे. आम्हीच नंबर वन आहोत असा टेंभा मिरवू नये. आता शिवसेनाच जिल्ह्यात नंबर वन असून पाच आमदारांची संख्या दहावर पोहोचायला आता वेळ लागणार नाही. असे सांगून शहरी व ग्रामीण निवडणुकांमध्ये केवळ आणि केवळ शिवसेनेचीच सत्ता येणार आहे. या विजयाचे वाटेकरी होण्यासाठी आता सज्ज राहण्याचे आवाहन करत खासदारकीची गाडी ही आमच्या भरोशावर आहे; ती पलटी करायला वेळ लागणार नाही. असाही मार्मिक टोला त्यांनी लगावला.
कोविडसाठी 25 कोटी
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की "जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला आता टप्याटप्याने रूग्णवाहिका देत आहोत. पुढील काळात प्रत्येक तालुक्यासाठी स्वर्गरथ देण्याचे नियोजन आहे. समाजसेवा हे शिवसेनेचे मुख्य कर्तव्य व काम असल्याने समाजातील विविध प्रश्न व समस्या शोधून त्यांची सोडवणूक करण्यासाठी शिवसैनिकांनी सतत सजग रहावे. जिल्ह्यात अनेक प्रश्न असून त्यांची सोडवणूक करण्याची मानसिकता असली; तरी काही अडचणीमुळे गतीने कामे करता येत नाही. जे शंभर कोटी मिळणार आहेत, त्यापैकी 25 कोटी कोविड- 19 साठीच दिले जाणार असल्याने विकासासाठीचे आर्थिक नियोजन करावयाचे आहे.
आता रूग्ण संख्या बरे होण्याचे प्रमाण वाढणार
कोरोनाशी खंबीरपणे लढण्याचे काम पोलिस, डॉक्टर प्रामाणिकपणे करीत असून त्यांनाही योग्य तो धीर व मदत देणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली त्यामागे काही चुका होत्या; त्यांची दुरुस्ती आता होत असल्याने बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व जिल्हाधिकारी बदलविण्यात आले असुन आता मृत्यू दर कमी होऊन रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. परंतु असे असले तरी कोरोना दुर्लक्षित करून चालणार नाही. आणखी काही दिवस त्यासाठी सर्वांनीच अलर्ट राहणे आवश्यक आहे.
सीसीआयला संपुर्ण कापूस खरेदी करावाच लागणार
पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या कापसाचे पंचनामे झाले असून सर्व कापूस सीसीआयला खरेदी करावाच लागेल. मका खरेदी संदर्भातही राज्य सरकारचे सर्वार्थाने प्रयत्न सुरू आहेत. तसेच शाळा सुरू करण्यासंदर्भात व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले.