
उजव्या कालव्याचे गेट अर्धवट बंद करण्यात आले आहे. या गेटमधून पाण्याचा विसर्ग २५ दिवसांपासून सुरूच आहे.
पाचोरा : खडकदेवळा खुर्द (ता. पाचोरा) शिवारातील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून २५ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली. हिवरा मध्यम प्रकल्पातून गेल्या महिन्यात रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन उजव्या कालव्याच्या गेटमधून सोडण्यात आले होते.
आवर्जून वाचा- शहरात कंपाउंडर तर गावात डॉक्टर बनून थाटला व्यवसाय; छापा पडला आणि सत्य समोर आले !
आवर्तनाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत उशिरा का होईना पोचले. त्यानंतर उजव्या कालव्याचे गेट अर्धवट बंद करण्यात आले आहे. या गेटमधून पाण्याचा विसर्ग २५ दिवसांपासून सुरूच आहे. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा कमी होत असून, त्याची झळ भविष्यात शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. अधिकारी व कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे व पाण्याचा विसर्ग व नासाडी थांबवावी. उजव्या कालव्याचे गेट नादुरुस्त असल्याने पाण्याचा प्रवाह थांबत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने या गेटची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आवश्य वाचा- शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी: रावेरला मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू
तसेच कालव्याच्या गेटजवळ व चाऱ्यांमध्ये काटेरी झाडेझुडपे प्रचंड प्रमाणात वाढल्याने आवर्तनाचे पाणी पोचण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होते. ही काटेरी झाडेझुडपेही काढण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
जळगाव
संपादन- भूषण श्रीखंडे