शिवसेनेचे आमदार किशोर पाटील कोरोना पॉझिटीव्ह...मुंबईला गेल्यानंतर झाला त्रास 

प्रा. सी. एन. चौधरी
Saturday, 22 August 2020

पाचोरा- भडगाव मतदार संघातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील गेल्या दोन दिवसांपूर्वी मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भातील आढावा व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. शुक्रवारी (ता. 21) सायंकाळी ते मुंबईहून परतल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास झाला.

पाचोरा : पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून संपर्कात आलेल्यांनी त्रास जाणवल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 
पाचोरा- भडगाव मतदार संघातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील गेल्या दोन दिवसांपूर्वी मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भातील आढावा व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. शुक्रवारी (ता. 21) सायंकाळी ते मुंबईहून परतल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास झाला. त्यांची कन्या अभिनेत्री डॉ. प्रियंका पाटील हिने त्यांना कोरोनाची तपासणी करून घेण्यासंदर्भात आग्रह केल्याने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आमदार किशोर पाटील यांना खोकल्या व्यतिरिक्त इतर कोणताही त्रास नाही. 

स्वीय सहाय्यकही होते कोरोना पॉझिटीव्ह 
गेल्या आठवड्यात त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना व शिवालय कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश देत स्वतः क्वारंटाईन झाले होते. परंतु, कामानिमित्ताने मुंबई येथे जाणे आवश्‍यक असल्याने ते मुंबईला गेले असता त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी निवासस्थानीच क्‍वारंटाईन होऊन उपचार घेण्यास सुरवात केली असून जे कोणी संपर्कात आले असतील त्यांना काही त्रास जाणवल्यास त्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. 

पाचोऱ्यात संख्या वाढतेय 
दरम्यान पाचोरा येथे कोरोना बाधितांची संख्या गतीने वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी शहरातील रस्ते, बाजारपेठ मात्र फुल्ल आहे. दुकानदार तसेच ग्राहक, नागरिक यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने संसर्गाची लागण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी परंतू घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, ताप असा कोणताही त्रास जाणवल्यास तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे . 

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora mla kishor patil corona positive in mumbai travling