शिक्षकांच्या ड्युटीमुळे ऑनलाइन शिक्षणाचा फज्‍जा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात तसेच लॉकडाउन अंमलबजावणी कार्यासाठी ड्युट्या देण्यात आल्या आहेत. याठिकाणी सात ते आठ तास शिक्षकांना खडा पहारा द्यावा लागत आहे. कोरोना संसर्गाची लागण संपेपर्यंत अशा प्रकारचे कामकाज शिक्षकांना करावे लागणार आहे.

पाचोरा : कोरोना पार्श्वभूमीवर प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुषंगाने विविध शैक्षणिक संस्थांनी आपापले व्हाट्सअप व झूम ग्रुप तयार केले असून त्याद्वारे दररोज ऑनलाइन शिक्षण देणे सुरू केले असले, तरी शिक्षकांना कोरोना संदर्भातील ड्युट्या देण्यात आल्याने या ऑनलाइन शिक्षणाचा अक्षरशः फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे. 

प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात तसेच लॉकडाउन अंमलबजावणी कार्यासाठी ड्युट्या देण्यात आल्या आहेत. याठिकाणी सात ते आठ तास शिक्षकांना खडा पहारा द्यावा लागत आहे. कोरोना संसर्गाची लागण संपेपर्यंत अशा प्रकारचे कामकाज शिक्षकांना करावे लागणार आहे. असे असताना शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया सुरू केल्याने कोरोना संदर्भातील ड्यूटी करावी की ऑनलाईन शिक्षण द्यावे ?अशा चक्रव्यूहात शिक्षक अडकले आहेत. या शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी व पालकांना आपले मोबाईल क्रमांक देऊन तसेच त्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या विषय निहाय वेळा दिल्या आहेत. परंतु शिक्षकांना प्रतिबंधित क्षेत्रात ड्यूटी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शिक्षकांना शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांचा गोंधळ होत असून शिक्षकांना निदान ऑनलाइन शिक्षणासाठी तरी मोकळे ठेवावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही ही अशी मागणी पुढे आली आहे. 
 
मोबाईलमुळे मुले भरकटण्याची भीती 
दरम्यान ऑनलाइन शिक्षण धोरणा संदर्भात समाज मनातून नाराजीचा सूर व्यक्त होत असून अशा ऑनलाइन मुळे अत्यंत कमी वयात विद्यार्थ्यांना मोबाईल व लॅपटॉपचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल त्यामुळे त्यांच्या डोळ्यांसह नाजूक इंद्रियांवर विपरीत परिणाम होऊन आरोग्य समस्या वाढण्याची भीती पालक व जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. तसेच मोठ्या वयोगटातील मुलांना ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईलची गोडी लागून ते मोबाइलच्या आहारी जाऊन ते भरकटण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. शासनाने अभ्यासक्रम कमी करावा परंतु ऑनलाइन पेक्षा वर्गातच शिक्षण द्यावे अथवा किमान सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तरी या ऑनलाइन शिक्षणापासून दूर ठेवावे अशी मागणी समाज मनातून पुढे आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora online education not growth teacher corona duty