
पतीला बरे वाटत नसल्याने ते स्वतःहून १९ जुलैला पाचोरा येथे साईमोक्ष हॉटेल या शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाले. त्याच दिवशी सायंकाळी कुटुंबीयांनी त्यांची भेट घेऊन फळे व बिस्किटे दिली. त्यांच्याजवळ ४० हजार रुपये, मोबाईल आदी साहित्य होते.
पाचोरा (जळगाव) : राणीचे बांबरुड (ता. पाचोरा) येथील विनोद कोकणे यांचा शासकीय विलगीकरण कक्षात झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून घातपात आहे. याची चौकशी होऊन न्याय मिळत नसल्याने स्व. कोकणे यांची पत्नी भारती यांनी न्यायासाठी गुरुवारी (ता. १७) दोन्ही मुलांसह पाचोरा येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
भारती कोकणे यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत पतीचा मृत्यू, चौकशीस झालेला विलंब यासंदर्भात माहिती दिली. निवेदनात म्हटले आहे, की पतीला बरे वाटत नसल्याने ते स्वतःहून १९ जुलैला पाचोरा येथे साईमोक्ष हॉटेल या शासकीय क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाले. त्याच दिवशी सायंकाळी कुटुंबीयांनी त्यांची भेट घेऊन फळे व बिस्किटे दिली. त्यांच्याजवळ ४० हजार रुपये, मोबाईल आदी साहित्य होते. घरी गेल्यावरही रात्री फोनवर त्यांच्याशी बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी कोरोनाचा अहवाल आल्यावर घरी येईन, असे सांगितले होते.
आत्महत्या केल्याचा बनाव
दुसऱ्या दिवशी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला व त्याच दिवशी मध्यरात्री त्यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला. २२ जुलैला त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. तत्पूर्वी क्वारंटाइन सेंटरच्या यंत्रणेने २१ जुलैला परस्पर अंत्यविधी उरकला. शवविच्छेदन देखील केले गेले नाही. कोरोना अहवाल निगेटिव्ह असताना परस्पर अंत्यसंस्कार करण्यामागे उद्देश काय? तसेच त्यांच्याजवळील रक्कम गेली कुठे? असे प्रश्न उपस्थित करत ही आत्महत्या नसून, घातपात असल्याचा आरोप भारती यांनी केला आहे.
म्हणून दिला इशारा
वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे तसेच याठिकाणी उपस्थित असलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस यांच्या चौकशीसाठी पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्याकडे वेळोवेळी मागणी व तक्रारी केल्या. परंतु दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. १७) दुपारी अकराला पाचोरा येथे शिवाजी महाराज चौकात मुलगी प्राची (वय ५) व मुलगा ध्रुव (वय २) यांच्यासह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे