हृदयाचा ठोका चुकला..धावत्‍या रेल्‍वेतून प्लॅटफॉर्मवर पडली महिला

चंद्रकांत चौधरी
Sunday, 6 December 2020

धडधडत येणारी गोवी एक्‍स्‍प्रेस धावत असताना दरवाजात उभ्‍या असलेल्‍या महिला तोल जावून प्लॅटफॉर्मवर पडली. हे दृश्‍य पाहून रेल्‍वेस्‍थानकावर उभ्‍या साऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. येथे उपस्‍थित पोलिसांनी महिलेस लागलीच रूग्‍णालयात दाखल केले.

पाचोरा (जळगाव) : येथील रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या गोवा एक्सप्रेस या धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर पडून गंभीर जखमी झालेल्या मध्यप्रदेशातील महिलेचे प्राण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले. जखमी महिलेस तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

गोवा एक्सप्रेसमधून प्रवास करणारी महिला धावत्या रेल्वेतून पाचोरा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पडली. तिच्या डोक्यास जबर मार लागल्याने पडताचक्षणी बेशुद्ध झाली. यावेळी रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे यांनी तत्परतेने पोलीस नाईक दिनेश पाटील यांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णवाहिकेचा चालक बबलू मराठे, नदीम शेख यांच्या सहकार्याने जखमी महिलेस लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 

आधारकार्डवरून ओळख
तिच्याजवळ आधार कार्ड सापडल्याने तिचे नाव लक्ष्मीदेवी रामकुमार (रा. मेहगाव, मध्य प्रदेश) असे निष्पन्न झाले. याच आधार कार्डवर मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. त्यावर संपर्क साधला असता जखमी महिलेचा पती रामकुमार यांच्याशी संपर्क झाला. त्यास झाल्या प्रकाराची माहिती देऊन पाचोरा येथे येण्याचे सांगितल्याने सदर जखमी महिलेचा पती शनिवार (ता. 5) दुपारी पाचोरा येथे आल्यानंतर शहानिशा करून व ओळख पटवून जखमी महिलेस त्याच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वे पोलीस नागेश दंदी, महिला पोलीस अंशू राऊत यांनीही या कामी सहकार्य केले. रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे गंभीर दुखापत झालेल्या महिलेवर त्वरित उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांच्या या मानवतावादी कार्याचे कौतुक होत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora railway station goa express run women droped and injured