
पाचोरा ः पाचोरा व भडगाव तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना व विरोधी असलेल्या भारतीय जनता पक्षात कुरघोडीचे युद्ध चांगलेच रंगले आहे. या कुरघोडी युद्धात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही उडी घेतल्याने राजकीय गडगडाट चांगलाच वाढला आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात उपाययोजना म्हणून शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे प्रशासनातर्फे विविधांगी धोरणांची अंमलबजावणी करीत आहेत. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपचे अमोल शिंदे करीत आहेत. आमदार किशोर पाटील यांनी लॉकडाउनच्या काळात मतदारसंघात घरपोच भोजन वाटपाचा कार्यक्रम राबवला. त्यानंतर स्वस्त धान्य मिळत नसलेल्यांना किराणा साहित्याचे वाटप केले. आमदार निधीतून ‘पीपीई किट’सह इतर उपयुक्त साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवले. पाचोरा व भडगाव तालुक्यातील लोकांना ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्या घरपोच वाटप केल्या. कापूस खरेदीस विलंब होत असल्याने कापूस खरेदी केंद्र वाढवावीत या मागणीसाठी बैठकांचे आयोजन केले. आमदार किशोर पाटलांच्या या सर्व उपक्रमांना अमोल शिंदे यांनी तोडीस तोड उत्तर देत अन्नपदार्थांच्या पाकिटांचे वाटप, किराणा साहित्याचे वाटप, आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आमदार महाजनांच्या मदतीने ‘पीपीई किट’चे केलेले वाटप, होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप, तसेच आपले काका सतीश शिंदे हे बाजार समितीचे सभापती असल्याने जिनिंग मालकांची बैठक घेऊन जास्तीच्या खरेदी केंद्रासंदर्भात केलेल्या हालचाली व वरिष्ठांकडे पाठवलेला अहवाल आमदारांना आव्हानात्मक ठरला आहे. विशेष म्हणजे पालिकेत आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. सध्या कोरोनामुळे व्यापाऱ्यांसह सर्वच आर्थिक विवंचनेत असल्याने पालिकेने मालमत्ता कर व गाळ्यांचे भाडे माफ करावे, अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले. हा प्रकार शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने नगराध्यक्ष संजय गोहिल व उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी माध्यमांसमोर येऊन अमोल शिंदे यांना खुले आव्हान केले, की मालमत्ता कर व गाळे भाडे माफी संदर्भात पालिकेने ठराव करून तो मंजूर होऊन माफी मिळाल्यास आम्हालाही आनंद होईल. परंतु अमोल शिंदे यांनी जिल्ह्यात ज्या- ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी तसेच जामनेर पालिकेत कर माफीसाठी आग्रह धरावा व माफी द्यावी. बाजार समितीतील सतीश शिंदे यांची सत्ता असल्याने आडते, व्यापाऱ्यांना मार्केट फी व गाळेधारकांना भाडे माफ करावे तसेच शिंदेंकडून चालविण्यात येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक तसेच ‘सीबीएसई’च्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फी माफी करावी, प्रवेश फी घेऊ नये, अशी मागणी केली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर देवरे यांनी बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरूडे यांना निवेदन देऊन बाजार समितीत मार्केट फी माफ करावी तसेच समितीच्या गाळेधारकांचे भाडेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माफ करावे व त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. या वादात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही उडी घेऊन ‘जोर का झटका धीरे से लगे’ची प्रचिती आणून दिली आहे. दिलीप वाघ
यांनी जास्तीचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादीचे संजय वाघ, नितीन तावडे, खलील देशमुख, सतीश चौधरी, रणजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता योगेश देसले यांच्यामार्फत सहकार व पणन मंत्र्यांशी संपर्क साधून कापूस खरेदीचा प्रश्न मंत्र्यांकडे
मांडला. त्याआधारे मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून भडगाव व नगरदेवळा येथील जिनिंगमध्ये त्वरित ग्रेडर नियुक्ती करून कापूस खरेदी सुरू करावी असे आदेश दिले. शिवसेना-भाजपच्या कुरघोडीच्या युद्धात राष्ट्रवादीने टाकलेला हा बॉम्ब राजकीय गडगडाट वाढविणारा ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.