विश्‍वासात घेत केला विवाह अन्‌ तलाठी महिलेचा घात

चंद्रकांत चौधरी
Tuesday, 1 December 2020

विवाहानंतर वेळोवेळी चारित्र्याच्या संशयावरून नितीनने अरुणाचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्याबाबत अरुणाने आईजवळ अनेकदा सांगितले. परंतु नितीनचा स्वभाव बदलेल, अशी अरुणाची समजूत वेळोवेळी घातली.

पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीचा निलंबित पोलिस पतीनेच डोक्यात अवजड वस्तू टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसानेच कबुली दिल्यावरून पाचोरा पोलिसांनी पोलिस पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

विश्‍वासात घेवून केला विवाह
अरुणा पवार असे मृत तलाठी पत्नीचे नाव असून, त्या माहिजी येथे काही महिन्यांपासून कार्यरत आहेत. येथील मौर्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्या वास्तव्यास आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या मुंबईला पोलिस असलेल्या भावाचे निधन झाल्याने कागदपत्रांची जमवाजमव व इतर प्रक्रियेसाठी त्यांचे मुंबईला जाणे- येणे होते. यादरम्यान मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत असलेले नितीन पवार यांच्याशी त्यांची ओळख झाली. नितीन यांनी त्यांचा विश्‍वास संपादन केला. माझा पहिला विवाह झालेला असला तरी पत्नीसोबत राहत नाही, असे खोटे सांगून त्यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. २२ नोव्हेंबर २०१७ ला दोघे विवाहबद्ध झाले. 

तिचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत बोलणे अन्‌ पतीचा संशय
विवाहानंतर वेळोवेळी चारित्र्याच्या संशयावरून नितीनने अरुणाचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्याबाबत अरुणाने आईजवळ अनेकदा सांगितले. परंतु नितीनचा स्वभाव बदलेल, अशी अरुणाची समजूत वेळोवेळी घातली. तलाठी असल्याने शेतकरी, सहकारी कर्मचारी, अधिकारी यांचे सतत फोन येत असल्याचा राग नितीन यांना येत असे. याच कारणावरून रविवारी (ता. २९) दुपारी दोघांमध्ये भांडण झाले. या वेळी राग अनावर झाल्याने नितीनने अवजड वस्तू अरुणाच्या डोक्यात मारली व पळवाट म्हणून शेजाऱ्यांना व रुग्णालयात जिन्यावरून पाय घसरून पडल्याने डोक्याला मार लागल्याची बतावणी करत खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना कळताच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 

पोलिसांनी जिना पाहिल्‍यावर आला संशय
पोलिस उपअधीक्षक ईश्‍वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, अजय मालचे, मुकुंद पाटील यांनी नितीन यांच्या घराची व ज्या जिन्यावरून पत्नी पडली त्या जिन्याची पाहणी केल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. घरातील जिन्याला एकूण ३० पायऱ्या असून, अरुणा जिन्यावरून पडली असती तर निदान तिच्या शरीराला इतरत्र खरचटले असते. परंतु फक्त डोक्यालाच मार कसा लागला? हा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी नितीनवर संशय व्यक्त करत त्यास ताब्यात घेतले. 
 
संशयितास अटक 
मृत तलाठी अरुणा पवार यांची आई मीराबाई ठाकरे (रा. भुसावळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्याने पोलिसांनी नितीन यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने अवजड वस्तू डोक्यात टाकून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही तासांत या खुनाच्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी नितीन पाटील यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora talathi wife murder police husband