पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

गेल्या वर्षी पावसाने अक्षरशः थैमान घातले. त्यामुळे खरीप उत्पादन हातचे गेले. विशेष म्हणजे खरीप हंगाम हाताशी येण्याच्या वेळीच सततच्या पावसामुळे उत्पादनाचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला.

पाचोरा : तालुक्यातील बहुतांश शेतकरी अजूनही पीक विम्याच्या लाभापासून वंचित असून, संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे न्यायाच्या मागणीसाठी बळीराजा आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह महसूल व कृषी विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. 
गेल्या वर्षी पावसाने अक्षरशः थैमान घातले. त्यामुळे खरीप उत्पादन हातचे गेले. विशेष म्हणजे खरीप हंगाम हाताशी येण्याच्या वेळीच सततच्या पावसामुळे उत्पादनाचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी म्हणून पीक विम्याचे गाजर दाखवले होते. कधी पावसाअभावी, तर कधी पावसामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामाच्या उत्पादनाचे नुकसान होण्याचे सातत्य कायम आहे. शेतकरी पीक विम्याकडे आकर्षित होतात. तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. पावसामुळे कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीनसह बागायती व कडधान्याचे प्रचंड नुकसान झालेले असताना विमा कंपनीने मात्र शेतकऱ्यांना दिलेले भरपाईचे आश्वासन पाळले नाही. पावसामुळे नुकसान झाल्यानंतर कृषी व महसूल विभागाने पंचनामे केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भरपाईबाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, विमा कंपनीने केवळ मक्याच्या नुकसानीसंदर्भातच विमा मंजूर केला. इतर पिकांच्या नुकसानीसंदर्भात कंपनीने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पीक विम्याचे हप्ते विमा कंपनीने घेतले. नुकसान झाल्यास आपल्याला भरपाई मिळेल, या आशेने शेतकऱ्याने विम्याचा हप्ता भरला आणि नुकसान झालेले असताना कंपनीने मात्र हात वर करीत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे विमा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. न्याय न मिळाल्यास विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

विमा कंपनीची भरपाईबाबत टाळाटाळ 
संदीप पाटील
ः पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे खरिपासह रब्बी पिकांचे सततचे होत असलेले नुकसान पाहून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही पीक विमा काढला. प्रचंड आर्थिक संकटात असताना आपल्याला भरपाई मिळेल, या आशेने विमा हप्ता भरला. मात्र, पावसामुळे नुकसान होऊनही विमा कंपनी भरपाई द्यायला टाळाटाळ करीत आहे. हा प्रकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा आहे. 

विमा कंपनीचे दुटप्पी धोरण 
विलास पाटील
ः गेल्या वर्षी पावसामुळे खरीप उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु मका वगळता इतर कोणत्याही पिकाच्या नुकसानीचा विमा कंपनीने शेतकऱ्यांना लाभ दिला नाही. शासन नुकसान भरपाई देईल, अशी भूमिका विमा कंपनीची आहे. विम्याचा हप्ता कंपनीने घ्यावा आणि नुकसान भरपाई मात्र शासनाने द्यावी, हे दुटप्पी धोरण योग्य नाही. शेतकऱ्यांवरील हा अन्याय विमा कंपनीने थांबवावा. 

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 
भरत पाटील ः
शेतीमालाचे नुकसान झाले तर भरपाई मिळेल, अशी अपेक्षा पीक विमा काढण्यामागे होती. जवळ पैसा नसताना देखील व्याजाने पैसा काढून विम्याचा हप्ता भरला. प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनीने अजूनही नुकसान भरपाई दिली नाही. निसर्गासोबतच विमा कंपनीने देखील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विमा कंपनीने न्याय न दिल्यास, शेतकरी आंदोलन करतील.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora taluka farmer pik vima yojna fraud in company