वाळूचा वाद : तहसीलदारांची डॉक्टरच्या कानशिलात 

चंद्रकांत चौधरी
Saturday, 17 October 2020

कामासाठी घराजवळील बांधकामातून रेती आणली. ती दवाखान्याजवळ ओतण्याचे काम सूरू असताना तहसीलदार कैलास चावडे यांचे वाहन त्या परिसरातून जात असताना ते त्यांच्या लक्षात आले.

पाचोरा (जळगाव) : भडगाव रोड भागातील डॉक्टर व पोलिस बॉइज असोसिएशनचे जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील यांना वाळूच्या वादातून खुद्द तहसीलदारांनी कानशिलात लगावल्याची एकच चर्चा दिवसभर रंगली. दरम्यान, प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने तहसीलदारांनी माफी मागितली व त्यानंतर आपण गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचे संबंधित डॉक्टरांचे म्हणणे आहे, तर असे काही झालेच नसल्याचा दावा तहसीलदारांनी केला आहे. 
पाचोरा शहर व तालुक्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नदीपात्रात रेतीसाठी वाहने उतरणार नाहीत, असा आदेश असला तरी चोरटी रेती वाहतूक सुरूच आहे. यामुळे मागील काळात प्रांताधिकाऱ्यांच्या घरावरील दगडफेक ते त्यांच्या वाहनचालकाला झालेली दुखापत, अशा अनेक घटना घडून गेल्या आहेत. 

रेती ओततांना पाहिले अन्‌
भडगाव रोडवर डॉ. पाटील यांच्या दवाखान्याचे काम सुरू आहे. त्यांनी त्या कामासाठी घराजवळील बांधकामातून रेती आणली. ती दवाखान्याजवळ ओतण्याचे काम सूरू असताना तहसीलदार कैलास चावडे यांचे वाहन त्या परिसरातून जात असताना ते त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच गाडी थांबवत डॉ. अतुल पाटील यांना रेती कुठुन आणली? त्याची परवानगी काढली होती का? असे विचारत सरळ त्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप होत आहे. या वेळी घटनास्थळी पोलिस कर्मचारीही होते. 

काही झाले नसल्‍याचा दावा
डॉ. पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या समोर मांडला. पोलिस निरीक्षक यांनी परिस्थिती समजून घेऊन तहसीलदारांना पाचोरा पोलिस ठाण्यात बोलावले. तहसीलदार चावडे यांनी प्रथम असे काही घडलेच नाही, असा दावा केला. मात्र डॉ. पाटील यांनी फिर्याद देण्याचा आग्रह धरताच तहसीलदारांनी झालेली घटना अनावधानाने झाली असून, मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगितले अन् वादावर पडदा पडला.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora valu issue tahshildar and doctor fight