कोरोना व्हायरसमध्ये पाचोराकरांच्या जीवाशी खेळ; जलशुद्धीकरण केंद्रच बंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

पाचोरा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ओझर (ता. पाचोरा) गावाजवळ गिरणा नदीपात्रात के. टी. बंधारा बांधण्यात आला आहे. गिरणा धरणातून सोडलेले पाणी या बंधाऱ्यात अडवून तेथून पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेने सुरुवातीला साडेपाच कोटी रुपये खर्चाची व नंतर साडेअठरा कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.

पाचोरा : पालिकेतर्फे सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात असून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची खेळ खेळण्याचा प्रकार केला जात आहे. यामुळे समाजमनातून नाराजीचा संतप्‍त सूर व्यक्त होत आहे. शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती लक्षात घेता, पालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. 
पाचोरा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ओझर (ता. पाचोरा) गावाजवळ गिरणा नदीपात्रात के. टी. बंधारा बांधण्यात आला आहे. गिरणा धरणातून सोडलेले पाणी या बंधाऱ्यात अडवून तेथून पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेने सुरुवातीला साडेपाच कोटी रुपये खर्चाची व नंतर साडेअठरा कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात नवीन जलकुंभ उभारण्यात आले असून जास्त क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. चार वर्षांपूर्वी पर्यायी पाणीपुरवठा योजना म्हणून बहूळा धरणातून साडेसहा कोटी रुपये खर्चाची योजना राबविण्यात आली. मात्र, या योजनेतून शहरवासीयांची तहानच भागली नाही. त्यामुळे के. टी. बंधारा वगळता इतर कोणताही दुसरा पाण्याचा स्रोत पालिकेने तयार केलेला नाही. परिणामी, पाणीटंचाईचा प्रश्न अद्यापही ‘जैसे थे’ आहे. गेल्या आठवड्यापासून गढूळ पाणी येत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. 

जलशुद्धीकरण केंद्र नावाला 
पालिका प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली असता, गिरणा नदीला पाणी आल्याने तसेच भडगाव रोड भागात मुख्य जलवाहिनीचे काम सुरू असल्याने गढूळ पाणीपुरवठा झाला असावा, असे उत्तर मिळाले. गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे भीती पसरली आहे. अशातच पालिकेकडून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये आणखीनच भीती निर्माण झाली आहे. पालिकेने गणेश कॉलनी भागातील जुन्या जलकुंभाजवळ लाखो रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. मात्र, हे केंद्र बंद असल्याने गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले. भडगाव रोड भागातील नव्या वसाहतीत अजूनही जलशुद्धीकरण केंद्राची जोडणी करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. पालिका प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्राचे शुद्ध पाणी का नसेना परंतु नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण झालेले ‘टीसीएल’चा वापर केलेले पाणी पुरवावे, अशी मागणी होत आहे. 

गढूळ पाण्याचा पुरवठा नळांद्वारे करण्यात आल्याचे समजले. भडगाव रोड भागात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्र देखील काही तांत्रिक दोषामुळे बंद आहे. त्यामुळे दोष निवारण करून जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ व दुर्गंधी नसलेल्या पाण्याचा सुरळीत व योग्य प्रमाणात पुरवठा करण्यासंदर्भात संबंधित विभागास आदेशित करण्यात आले आहे. 
- शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपालिका, पाचोरा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Water Treatment Plant closed and supply damage