
पोलिसांना कर्तव्यावर असताना हक्काची जागा नसल्याने मिळेल त्या ठिकाणी ते थंडीत कुडकुडत रात्र काढतात.
पहूर (ता. जामनेर) : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या बिकानेर मिठाईवाला या दुकानातून चोरट्याने १५ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून, चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. विशेष म्हणजे, रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास पोलिस गस्तीवर होते. मात्र, त्याच वेळेस चोरटाही दुकानात शांततेत चोरी करत होता.
बसस्थानकाला लागूनच असलेल्या बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा पत्रा वाकवून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील पंधरा हजार रुपयांच्या रोकडसह पेनड्राइव्ह लंपास केले. ही घटना रविवारी (ता. २९) पहाटे पावणेदोनच्या सुमारास घडली. या बाबत दुकान मालक बालूसिंह राजपुरोहित (रा. साईनगर, पहूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक राहुल खताळ गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न करत असून, रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक खताळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केली असून, हवालदार शशिकांत पाटील तपास करीत आहेत.
चौकीविना बसस्थानक
पहूर बस स्थानकावर पोलिस चौकी असून नसल्यासारखी आहे. पोलिसांना कर्तव्यावर असताना हक्काची जागा नसल्याने मिळेल त्या ठिकाणी ते थंडीत कुडकुडत रात्र काढतात. पोलिस चौकी होण्यासाठी किंवा असलेली पोलिस चौकी वापरात येण्यासाठी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे