अजब पण गजब; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षालाच सॅनिटायझरचा नळ 

संजय पाटील
Sunday, 27 September 2020

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अशा स्‍थितीत प्रवाशी वाहतुक करताना अधिकच काळजी घेणे गरजेचे आहे. आपण स्‍वतःची काळजी घेत असलो तरी रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा देखील पहावी लागणार. याच उद्देशाने रिक्षा चालकाने अजब शक्‍कल लढविली. पण ही शक्‍कल गजब ठरत आहे.

पारोळा (जळगाव) : जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानातून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून ऑटो रिक्षांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्रवाशांची रिक्षात काळजी घेतली जावी, रोजगार देखील सुरळीत राहावा या भावनेतून शहरातील आनंदा महाजन या रिक्षाचालकाने रिक्षालाच प्लास्टिक पाइप बांधून यात सँनेटायझर टाकून पुढच्या भागात नळाची तोटी बसविली आहे. ‘हात धुवा अन्‌ रिक्षात बसा’ असे आवाहन महाजन हे करीत असल्याने शहरात रिक्षाचालकाच्या या अभिनव कल्पनेचे कौतुक होत आहे. 

म्‍हणूनच महाजन भाऊ फेमस
गेल्या २० वर्षांपासून आनंदा तुकाराम महाजन (रा. जुलुमपुरा, पारोळा) या युवकाने मनाशी जिद्द बाळगत रिक्षा व्यवसायातून नवी भरारी घेण्याचा प्रयत्न केला. ‘शरीराची ठेवण, तसा रिक्षांचा नेहमी लुक बदलवीत चर्चेत राहणारे महाजन यांनी सुरवातीला गावात रिक्षा व्यवसाय केला. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शाळकरी विद्यार्थी वाहतूक करीत असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचा चार महिने रोजगार बुडाला. यावर मात करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रवाशांचे हित जोपासण्याची कला आज महाजन युवा रिक्षाचालकाने जिवंत ठेवल्याने शहरात ‘महाजन भाऊ रिक्षावाले’, असे टोपणनाव त्यांना प्रवाशांनी दिले आहे. 

रिक्षाच्या टपावर पाईपलाईन
सध्या कोरोनामुळे बरेच प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करत आहेत. मात्र, आपला रिक्षा व्यवसाय वाढावा व लोकांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी, या उद्देशाने महाजन यांनी स्वखर्चातून रिक्षालाच प्लास्टिक पाइप बसवत हात सॅनिटाइज करीत रिक्षात बसविण्याचे काम ते करीत आहेत. अशा भयावह परिस्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आनंदा महाजन करीत असल्याने शहरात त्यांच्या रिक्षाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांकडूनही त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola corona virus auto driver create sanitizer pipe line