वाहतुकीचा खोळंबा ठराला तरूणासाठी काळ

संजय पाटील
Saturday, 28 November 2020

वाहतुकीच्या खोळंब्यामुळे सदर मोटार सायकल स्वार मयत झाल्याचे परिसरातील नागरिक बोलत होते. यावेळी मयतसोबत असलेल्या एकास किरकोळ इजा झाल्याची माहिती मिळाली आहे.

पारोळा (जळगाव) : महामार्ग लगत असलेल्या कजगांव चौफुलीवर वाहतुकीच्या झालेल्या खोळंबा व खराब रस्त्यामुळे अवजड वाहनाच्या धडकेने मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला. सदर घटना सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान घडली. अपघातात शहरातील 25 वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला.
शहरातील सुभाष रोड येथील रहिवाशी असलेला विजय धर्मा बडगुजर (वय २५) व त्याचे सहकारी मित्र वाहन दुरुस्तीचे साहित्य घेण्यासाठी मोटारसायकल (क्र. एमएच 14, बीएल 7637) या वाहनाने जात असतांना महामार्ग लगत असलेल्या कजगाव चौफुलीवर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने चौदा चाकी मोठ्या ट्राला (क्र. जीजे 12, बीडब्लु 8073) या अवजड वाहनाने मोटारसायकल स्वारास धडक दिली. यात विजय बडगुजर हे जागीच ठार झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकामी सहकार्य केले.

ट्रक चालक फरार
वाहतुकीच्या खोळंब्यामुळे सदर मोटार सायकल स्वार मयत झाल्याचे परिसरातील नागरिक बोलत होते. यावेळी मयतसोबत असलेल्या एकास किरकोळ इजा झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेत परिसरातील नागरिकांची गर्दी पाहता ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला आहे.

चौफुलीवर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा 
महामार्ग लगत चोरवड नाका, कजगांव चौफुली, अमळनेर नाका असे दुहेरी व तिहेरी मार्गाच्या चौफुली येतात. यात प्रामुख्याने कजगांव नाका येथे वाहन धारकांची नेहमीच वर्दळ असते. परिसरात वाहतुक पोलिस नियमित नसल्यामुळे नेहमीच वाहतुक ठप्प झाल्याचे अनेकवेळा आढळुन आले आहे. वाहतुक पोलिसऐवजी येथे बऱ्याच वेळा होमगार्ड सेवा बजावितांना दिसतात. यासाठी नियमित वाहतुक पोलिसांची नेमणुक करुन हा परिसर मोकळा ठेवावा. वर्दळ वाढणार नाही याबाबत नियोजन करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान घटनेमुळे सर्वच पोलिस हे या परिसरात वाहतुक मोकळी करणेकामी रस्त्यावर उतरले होते.

बडगुजर परिवाराचा आक्रोश
विजय हा मनमिळावु स्वभावाचा होता. स्‍वतःच्या मेटॅडोर (४०७) वाहनाने तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करावयाचा. परंतु घरातील कर्ता गेल्याने परिवाराने दु:ख व्यक्त केले. यावेळी सुभाष रोड परिसरासह हिंगलाज माता मंदीर परिसरातील नागरिक यांनी हळहळ व्यक्त केली.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola highway traffic jam and accident young boy death